विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतात दिल्या जाणार्या ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर घटविण्यासाठी आता पुन्हा एकदा विचार केला जात आहे. कोरोना लसीकरणाच्या रणनीतीशी संबंधित सरकारच्या तज्ज्ञांची याबाबत अनेकदा बैठका झाल्या आहेत. ज्या लोकांना सर्वाधिक धोका आहे अशांना कमी अंतराने लस मिळू शकेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग वेगाने फैलाव होण्याचा धोका वाढत आहे. कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर घटविल्यास या व्हेरिएंटपासून संरक्षण होऊ शकते, असे पुरावे मिळाले आहेत.
यापूर्वी १३ मे रोजी भारताने कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतराला वाढवून कमीत कमी १२ आठवडे आणि जास्तीत जास्त १६ आठवडे केले होते. असे करण्यासाठी यूकेमधील एका अभ्यासाचा हवाला देण्यात आला होता. परंतु तीन दिवसांनंतर यूकेने अंतर घटवून १२ ते ८ आठवडे केले होते. डेल्टा व्हेरिंएटच्या धोक्याचा अंदाज घेऊन हे अंतर ५० वर्षांवरील लोकांसाठी हे अंतर घटविण्यात आले. यूकेमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा पुन्हा प्रसार होऊ लागला आहे.
सोमवारी यूकेने नवे आकडे जाहीर केले. त्यानुसार, ज्या लोकांनी कोविशिल्ड लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. ज्यांनी लशीचा एक डोस घेतला त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता जास्त होती. यूकेने ४० वर्षांवरील लोकांसाठी लशीच्या दोन डोसमधील अंतराला घटविले आहे. आता भारतातही तज्ज्ञ सरकारला लशीच्या दोन डोसमधील अंतर घटविण्याची मागणी करत आहेत. डेल्टा व्हेरिएंटला सध्या सर्वात धोकादायक स्ट्रेन मानले जात आहे.
लशीबाबतच्या कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा सांगतात, आम्ही लशीच्या मधील अंतराबाबत आढावा घेण्यास तयार आहोत. आपण पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करत आहोत असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही लशीशी निगडित निर्णय घेण्यासाठी इतर देशांमध्ये सुरू असलेल्या संशोधनावर लक्ष ठेवून आहोत. भारतात ४ आठवड्याच्या अंतराने लशीचे डोस दिले जात होते. तर यूकेमध्ये हे अंतर १२ आठवड्यांचे होते. त्यामुळे लोकांना वाटले की आपण ब्रिटेनच्या मागे जात आहोत. परंतु तसे नसून, लोकांची सोय व्हावी, यासाठी आम्ही निर्णय घेत आहोत.