माणिकराव खुळे
१-सध्या घड्याळ काटा दिशेचे, ‘प्रत्यावर्ती चक्रीय वारे’, केवळ ओरिसा राज्यावरच स्थिर आहेत.त्यामुळे बं.उपसागारातून ताशी ३० ते ३५ किमी. वेगाने, महाराष्ट्राकडे आर्द्रता घेऊन येणारे अपेक्षित वेगवान पूर्वीय वाऱ्यांना शिथिलथा प्राप्त झाली आहे. त्यामुळेच दि. १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान, महाराष्ट्रात अपेक्षित ढगाळ वातावरणासहित पावसाची शक्यता त्याबरोबरच मावळली.
२-पावसाची शक्यता दुरावली तर मग, थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे काय?
मावळलेल्या पावसाळी वातावरणामुळे महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहील. त्यामुळे पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि.१२ फेब्रुवारी(माघ पौर्णिमे) पर्यंत पहाटेचे किमान तापमानात १ ते २ डिग्री से.ग्रेड पर्यंत आता घसरण होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रात, येणाऱ्या ह्या १० दिवसात, चढ- उताराच्या थंडीसह सकाळच्या वेळेस हवेत गारवा जाणवण्याची शक्यता आहे.किमान तापमानात २ डिग्रीची घसरण होणार असली तरी हे किमान तापमान सरासरीपेक्षा २ डिग्रीने अधिकच असेल. कारण पूर्वी ढगाळ वातावरणामुळे ३ ते ५ डिग्री से. ग्रेड ने होणाऱ्या वाढी ऐवजी २ डिग्रीच्या घसरणीमुळे एकूणच किमान तापमानात आता केवळ सरासरीपेक्षा अंदाजे २ डिग्री से. ग्रेड नेच अधिक राहण्याची शक्यता जाणवते. किमान तापमानातील ही २ किंवा अधिक डिग्रीची घसरण, विशेषतः मध्य महाराष्ट्रातील खान्देश नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर ह्या ८ जिल्ह्यात अधिकच जाणवेल, असे वाटते.
३-सध्या चालु फेब्रुवारी संपूर्ण महिन्यात महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता आहे काय?
आता पर्यंतच्या थंडीच्या लाटेतून महाराष्ट्राला सहसा फेब्रुवारी महिन्यात सरासरी ५ ते ७ दिवसाच्या थंडीच्या लाटेचा कालावधी मिळत असतो.
मग ह्या वर्षीच्या ‘ला- निना’ च्या २०२५ च्या फेब्रुवारी महिन्यात ही साधारण तेव्हढ्याच ५ ते ७ दिवसाच्या कालावधीच्या थंडीच्या लाटेची अपेक्षा करू या!
४- ह्या आठवड्यातील पावसाची शक्यता मावळून, काहीशी थंडीची शक्यता वाढणे, हा वातावरणातील बदल, सध्याच्या रब्बी पिकांसाठी लाभदायी ठरणार काय ? वातावरणातील सध्याचा हा बदल हवेत गारवा वाढून, सध्याच्या रब्बी पिकांसाठी लाभदायी ठरणार आहे. शिवाय ढगाळ व दमट वातावरणाची शक्यता दुरावल्यामुळे आता मागास लागवड झालेल्या रब्बी पिकांवर बुरशी, मावा, किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाही. तसेच किरकोळ पावसाबरोबर ४ व ५ फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी नुकसानदेही गारपीटीची भीतीही गेली आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्याची वातावरणीय अवस्था ही रब्बी पिकासाठी नक्कीच लाभदायीच समजावी असे वाटते.
५- संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात दिवसाच्या कमाल तापमानाची व रात्रीच्या थंडीची स्थिती काय असेल?
ह्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईसह संपूर्ण कोकण व पुणे, सातारा अश्या ९ जिल्ह्यात ही शक्यता अधिकच दाट आहे. त्यामुळे थंडी साधारणच राहून एखाद- दुसऱ्या थंडीच्या लाटेतून महाराष्ट्रात थंडी मिळू शकते.
खान्देश, छ.सं.नगर जालना सोलापूर असे ६ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता अधिक आहे. वर स्पष्टीत ६ जिल्ह्यात मात्र हेच किमान तापमान सरासरी इतके जाणवेल, असे वाटते.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जाणवणारं ‘ कळंघण ‘ किंवा सुटणारं थंड वाऱ्याचं ‘ वरळ ‘ह्या वर्षीच्या ‘ ला-निनाच्या २०२५ च्या फेब्रुवारी महिन्यात ही जाणवण्याची शक्यता आहे. भले मानवी जीवनाला काहीसे बाधक ठरत असले तरी दाणा भरणीच्या रब्बी पिकांना फायदेशीर ठरते.
६- मग आता महाराष्ट्रातील सध्याच्या कमाल व किमान तापमानांची आजची स्थिती काय आहे ?
कोकण – मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान १८ ते २१ तर कमाल तापमान २८ ते ३२ डिग्री से.ग्रेड दरम्यान आहे. दोन्हीही तापमाने काहीसे सरासरीच्या खाली घसरले असल्यामुळे मुंबईसह कोकणातील वातावरण आल्हाददायक जाणवत आहे. हे वातावरण पुढील १० दिवस अपेक्षित आहे.
उर्वरित महाराष्ट्र- उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात (सोलापूर व कोल्हापूर १९ डिग्री वगळता) पहाटेचे किमान तापमान १५ ते १८ तर कमाल तापमान ( महाबळेश्वर २९. ५ डिग्री वगळता) ३२ ते ३५ डिग्री से.ग्रेड दरम्यान आहे. भागपरत्वे किमान तापमान(जळगांव ५.६, पुणे, सं.नगर व वर्धा ४वगळता) सरासरीपेक्षा २ ते ३ तर कमाल तापमान(अमरावती, ब्रम्हपुरी, बुलढाणा – ५ वगळता) सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्रीने अधिक आहे.त्यामुळे ह्या २९ जिल्ह्यात दुपारी उन्हाचा चांगलाच चटका जाणवतो आहे. अर्थात ही दैनिक तापमाने असल्यामुळे भागपरत्वे थोडी फार खाली वर होत असतात. पुढील १० दिवस ही तापमाने अजुन घसरण्याची शक्यता जाणवते.
७- ह्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय?
आतापर्यंतच्या डेट्यानुसार, संपूर्ण महाराष्ट्राची फेब्रुवारी महिन्याची पावसाची मासिक सरासरी ही साधारण दोन ते सव्वादोन सेमी.इतकी असते. अर्थात सरासरी क्षेत्र आधारित दोन ते सव्वादोन सेमी. पाऊस ह्या हंगामात किरकोळच पाऊस समजावा. आणि सरासरी पावसाचा दिवसही एखादाच असतो.
ह्या वर्षी २०२५ च्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भात अश्या १८ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी तर उर्वरित मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील १८ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.
८- ‘ ला-निना, इंडियन ओशन डायपोल व एम.जे.ओ ची सध्य:स्थिती काय दर्शवते?
ला-निना -सध्या विषववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या ‘ ला- निना ‘ स्थित असुन अजुन तीन महिने म्हणजे एप्रिल २०२५ पर्यन्त त्याचे अस्तित्व जाणवणार असुन मे २०२५ नंतर पुन्हा एन्सो तटस्थ अवस्थेत जाण्याची शक्यता आहे. पुढील २०२५ च्या मान्सून संबंधी खुलासा हा येणाऱ्या १५ एप्रिल ला होईलच.
इंडियन ओशन डायपोल-भारत महासागरीय द्विध्रुवीता( म्हणजे इंडियन ओशन डायपोल) सुद्धा सध्याच्या कालावधीत तटस्थ अवस्थेत असुन पुढील दोन महिन्यापर्यंत म्हणजे मार्च २०२५ अखेर पर्यन्त ही तटस्थ अवस्था टिकून राहण्याची शक्यता जाणवते.
एम.जे.ओ-भारत महासागर वि्षुववृत्तीय परिक्षेत्रात मागील आठवड्यापर्यंत जानेवारी २०२५ अखेर एक एम्प्लिटुड’ (वर्तुळ त्रिज्येसमान वर खाली होणारी कक्षा) सह एम.जे.ओ. ची उपस्थिती जाणवली. सध्या एम.जे.ओ भारत महासागर वि्षुववृत्तीय परिक्षेत्राच्या बाहेर आहे. त्यामुळे अवकाळी पावसासाठीची त्याची पूरकता सध्या नाही.जागतिक पातळीवरील वातावरणावर परिणाम करणाऱ्या सहसा ह्या तीन प्रणाल्यांच्या घडामोडी आणि सध्याची स्थिती अश्या पद्धतीची जाणवत आहे.
९-ह्या वर्षीच्या पूर्व-मोसमी काळात अवकाळी पाऊस, गारपीट व उष्णतेची स्थिती काय असेल?
पूर्व-मोसमी काळातील मार्च, एप्रिल, व मे ह्या तीन महिन्यात घडणाऱ्या, अवकाळी पाऊस, गारपीट व उष्णतेची काहिली ह्या मुख्य वातावरणीय घडामोडींची तीव्रता वर स्पष्ट केलेल्या एन्सो, आयओडी व एम.जे.ओच्या स्थित्यंतरावरही अवलंबून असतात. शिवाय देशाच्या, पूर्व-मोसमी हंगामाच्या, दिर्घ- पल्ल्याच्या अंदाजासाठी, जागतिक पातळीवर आतापर्यंत इतर हवामान घटकांच्या केलेल्या निरीक्षणांच्या नोंदीही विचारात घेतल्या जातात.
मे महिन्यात ला- निना जाऊन एन्सो तटस्थेत जाणार आहे. बऱ्याच कालावधीपासून तटस्थ असलेल्या आयओडीत ही एप्रिल महिन्यात बदलाची शक्यता आहे. त्याच बरोबर ९२ दिवसाच्या पूर्व-मोसमी काळात, मार्गस्थ होणारा एम.जे.ओ, कधी, किती दिवस व किती एम्प्लिटुडने भारत महासागर वि्षुववृत्तीय परिक्षेत्रात मार्गक्रमण करणार आहे, ह्या सर्व गोष्टीवर अवलंबून आहे. थोडक्यात १ मार्च दरम्यान घोषित होणाऱ्या पूर्व-मोसमी हंगामाच्या, दिर्घ- पल्ल्याच्या अंदाजानंतरच ह्यावर्षीच्या पाऊस, गारपीट व उष्णतेची स्थिती ह्या गोष्टी अधिक स्पष्ट होतील. इतकेच!
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.