मुंबई – पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले असून आता केवळ एक महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. देशाच्या काही भागात यंदा प्रचंड पाऊस होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर काही भागात अद्याप दुष्काळाची स्थिती आहे. विशेषत : महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला होता, परंतु त्याच वेळी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने पिके हातची जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावला असून आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. परंतु आता सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
यंदा देशातील काही राज्यांमध्ये पाऊस सामान्यपेक्षा जास्त झाला आहे. मुसळधार पावसामुळे उत्तर आणि पूर्व भारतातील अनेक भाग पावसामुळे परिस्थितीत भयानक आहेत. या भागातील नद्या धोक्याच्या चिन्हाच्या वर वाहत असून महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय हवामान खात्याने येत्या काही दिवसात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
भौगोलिक स्थितीनुसार गुजरात, राजस्थान, ओडिशा, केरळ आणि ईशान्य भारतात यापुढे पाऊस कमी पडेल, असा अंदाज आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानच्या पश्चिम भागात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. अनेक राज्यांत पाऊस अजूनही कमी पडत असल्याने पिके करपण्याची भीती आहे.
भारतीय हवामान विभागच्या मते, मध्य आणि पश्चिम भारतातील पर्जन्यमान कमी झाल्यानंतर २९ ऑगस्टपासून ते पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पात ३० ऑगस्टपर्यंत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, त्यानंतर ते कमी होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडच्या काही ठिकाणी पुढील २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी पुढील पाच दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत वायव्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल. तसेच हवामान विभागाने सांगितले की, ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, मध्य प्रदेशमध्ये काही ठिकाणी १ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडेल तसेच काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. केरळमध्ये आज रविवारी आणि उद्या सोमवारी काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.