विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली / मुंबई
यंदा देशातील सर्वच भागात पाऊसमान सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज हवामान खात्याने पावसाळ्याच्या प्रारंभीच वर्तविला होता. परंतु जून महिन्यात राज्यात काही भागात सर्वसाधारण पाऊस झाला असून जुलै महिन्यात मात्र महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन खूप मोठे नुकसान झाले. त्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाने उघडीप दिली असून महाराष्ट्र सह बहुतेक राज्यात भागात दुष्काळाची छाया दिसून येत आहे. मात्र आजपासून देशभरात अनेक भागात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने याबाबत इशारा दिला आहे.
राज्यात ऑगस्ट महिना कोरडाच गेला असून ६ जिल्हयातील २८ तालुक्यात दुष्काळाची छाया आहे. सहाजिकच पाऊस नसल्याने उभ्या पिकांना याचा मोठा फटका बसत आहे. परंतु आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ऑगस्ट अखेर पावसाची अनेक ठिकाणी शक्यता असून हा पाऊस पिकांना जीवदान देणारा ठरणार आहे. सध्या हवामान तथा वातावरण वेगाने बदलत आहे. आता ऑगस्ट महिना जवळजवळ संपला आला आहे. देशातील अनेक भागात दररोज पावसाचा इशारा जारी केला जात आहे.
दरम्यान, आज म्हणजेच दि. २७ ऑगस्ट रोजी देखील उत्तर भारतातून ईशान्य भारतात हलका ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज आणि उद्या आसाम आणि मेघालयात मुसळधार पावसाचे आगमन होऊ शकते. त्याच वेळी, उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या दिल्लीकरांना आज थोडा दिलासा मिळू शकतो, कारण आज दिल्लीमध्ये देखील हवामान बदलत असून येथे हलका पाऊस होईल. याशिवाय बंगाल आणि सिक्कीमच्या अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे, दक्षिणेकडील तामिळनाडू आणि केरळमध्ये पुन्हा एकदा पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या मते, दि. २९ आणि ३० ऑगस्ट रोजी दोन्ही राज्यांच्या अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते. तर, उत्तराखंडमध्येही सतत पावसाचा इशारा जारी केला जात आहे. दि.२८ ऑगस्ट रोजी हवामान खात्याने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत आणि नद्यांना वेग आला आहे. तसेच हवामान खात्या म्हणण्यानुसार, २७ ऑगस्टपासून ४ दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडेल. यामध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण, दक्षिण महाराष्ट्र तसेच गोव्याचा देखील समावेश आहे.
एका ताज्या अहवालानुसार, भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे की, वायव्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात आज म्हणजेच शुक्रवारी एक चक्रीवादळ सक्रिय असेल. यामुळे मान्सून अक्षाचा रविवारपासून पश्चिम टोकाला येण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्लीसह मध्य, दक्षिण आणि वायव्य भारतात पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.