नंदुरबार – हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सायंकाळी ६ वाजता हतनूर धरणातून तापी नदीपात्रात ७५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे ३ दरवाजे पूर्णपणे उघडून ४९ हजार ९५६ क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे ३ दरवाजे पूर्णपणे उघडून ४७ हजार ८३९ क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.