हिमाचल प्रदेश हे भारतातील असे एक राज्य जिथे निसर्गाने बर्फाच्छादित शिखरे, नद्या -नाले-धबधबे, हिरवीगार जंगले, जैवविविधता इ. अशा सर्वच गोष्टींची मुक्त उधळण केलेली आहे. सर्व राज्यच नैसर्गिकदृष्ट्या सुंदर आहे, असे म्हटले तरी चालेल. आपल्यापैकी पर्यटनाची आवड असलेले सर्व लोक साधारणतः प्रथम सहलीला कुल्लू-मनालीलाच जातात. परंतु अनेकांनी तेथील तिर्थन व्हॅली सारख्या हटके पर्यटनस्थळांना भेट दिलेली नसते. म्हणून आपण आज हिमाचल प्रदेशातील तिर्थन व्हॅली या अशाच एका हटके पर्यटनस्थळास भेट देणार आहोत. मला खात्री आहे जी मंडळी यापूर्वी कुल्लू-मनालीस जाऊन आले असतील. त्यांना तिर्थन व्हॅलीस भेट न दिल्याबद्दल नक्कीच वाईट वाटेल. चला तर मग…
चंदीगड येथून मनालीला जातांना मनालीच्या थोडे अलिकडे एक रस्ता तिर्थन व्हॅलीस जातो. तिर्थन व्हॅली ही साधारण २२/२५ किलोमीटर लांब दरी आहे. श्रीखंड महादेव मंदिर ते बंजार या गावापर्यंत तिर्थन व्हॅलीचा परिसर आहे. या दरम्यान गोशायनी, शोजा, नागिनी, जिभी, जांझरी अशी छोटी-छोटी गावे लागतात. या दरीत तिर्थन नदी वाहते जी पुढे लार्जी येथे बियास नदीस मिळते. या नदीमुळे या परीसरास तिर्थन व्हॅली असे नाव पडले आहे.
तिर्थन व्हॅलीचा सर्व परिसर पांढरे शुभ्र स्फटिकासारखे पाणी असलेली खळाळणारी तिर्थन नदी व इतर ओढे-नाले, त्यांच्यावरील असंख्य छोटे-मोठे लाकडी पुल, पाईन-देवदारची वृक्षराजी, बर्फाच्छादित शिखरे, धुके, फळे-फुले-पक्षी यांची मुबलक उपलब्धता असलेली जैवविविधता व मुख्य म्हणजे पर्यटकांना हवे असलेले शांत, मोहक व प्रदूषण विरहित वातावरण यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करत आहे.
नैसर्गिक बाबींबरोबरच स्थानिकांनी तरुण पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मासेमारी, रॅपलिंग, रिव्हर क्राॅसिंग, राॅक क्लायंबिंग, पॅराग्लायडींग, ट्रेकींग, कॅंम्पिंग अशा सोयी केल्या आहेत. तिर्थन व्हॅली परिसरातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील ग्रेट हिमालयन पार्क हा युनेस्कोच्या यादी समाविष्ट असलेला परीसर जैवविवीधतेने नटलेला आहे. या पार्कमधूनच अनेक ट्रेकची सुरवात होते. याचबरोबर जलोरी व बचेलो पास, बुढी नागिन मंदिर, सरोल्सर लेक, श्रृंगी मंदिर, चोई धबधबा व रघुपूर किल्ला अशा विविध पर्यटनस्थळांना भेट देता येते.
येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिर्थन नदीचे समृद्ध जलसंपत्ती व जैवविविधतेचे जतन व्हावे म्हणून येथे जलविद्युत प्रकल्पास परवानगी नाही व तिर्थन नदीतील ट्राऊट माशांची फिशिंग पर्यटक करू शकतात. मात्र परवानगी घ्यावी लागते व फी सुद्धा भरावी लागते. तिर्थन व्हॅली परिसरासाठी किमान ४/५ दिवस हवेच. तसेच या भागात प्रथमच जाणार्या पर्यटकांसाठी शिमला-कुल्लू, मनाली, सोलन व्हॅली, कसोल, रोहतांग ही नेहमीची पर्यटनस्थळेही आहेतच. मात्र दोन्ही परीसर फिरायचे असल्यास ८/१० दिवसांचा कालावधी हवा.
या पूर्ण परिसरात तुम्हाला हिमाचलची संस्कृती, दगडी कौलारु घरांमधे राहणारे डोगरी लोक, सफरचंदाच्या बागा असे टिपीकल पहाडी दृश्य दिसेल. चला तर आपणही अशा शहरी गजबजाटापासून दूर असलेल्या तिर्थन व्हॅलीला कसे जायचे, कधी जायचे व कुठे रहायचे इ बाबींबाबत जाणून घेऊया..
कसे पोहचाल
– तिर्थन व्हॅलीस जाण्यासाठी सर्वात जवळचा विमानतळ फक्त ५० किमीवर भुंतर येथे आहे. परंतु या विमानतळावर फार कमी विमाने येतात. त्यामुळे दुसरा पर्याय चंदीगडचा आहे. चंदीगड ते तिर्थन व्हॅली हे अंतर ३०० किलोमीटर आहे.
– अंबाला येथे जवळचे रेल्वे स्टेशन असून हे अंतर साधारणपणे ३३५ किमी आहे.
– मनाली हे प्रसिद्ध हिलस्टेशन जवळ असल्याने तिर्थन व्हॅली हे रस्ते मार्गे देशभरातून सर्व प्रमुख शहरांना जोडलेले आहे.
केव्हा जाल
येथे जाण्यासाठी मार्च ते जुलै हा कालावधी सगळ्यात उत्तम असला तरी बर्फवृष्टीचा आनंद घेऊ इच्छिणारे पर्यटक नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळातही जाऊ शकतात. मात्र पावसाळा टाळावा.
कुठे रहाल
या परिसरात अनेक छोटी-मोठी हाॅटेल्स असली तरी मी येथील नदीकिनारी असलेले सुंदर होम स्टे सूचविन. किंबहुना तिर्थन व्हॅलीस जाणार असाल तर तेथील होम स्टे मध्येच रहा व सहलीचा आनंद द्विगुणात करा.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!