डेव्हील कॅनयाॅन
‘देखो अपना देश’ ही भारतातील हटके पर्यटनस्थळांची मालिका सगळ्यांनाच आवडत आहे. तशा प्रतिक्रिया मला मेसेजवर येत आहेत. त्यामुळे मलाही रोज काहीतरी नवीन परंतु जे फार पर्यटकांना माहिती नाही, असे ठिकाण तुमच्या समोर मांडायला हुरुप येतो आहे. आजवर आपण अनेक पर्यटन स्थळांची माहिती घेतली. आजही आपण अशाच एका नवीन पर्यटन स्थळावर जाणार आहोत. आपल्या शेजारचे राज्य गोवा. येथील हे आगळे वेगळे ठिकाण म्हणजे डेव्हील कॅनयाॅन.
तुम्ही जर गोव्यातील गर्दीच्या समुद्र किनार्यांना कंटाळला असाल आणि काही तरी वेगळे पाहायचे असेल तर डेव्हील कॅनयाॅन हे एक गोव्यातील लपलेलं रत्न आहे, असे म्हणायला हरकत नाही. याठिकाणी आपला एक दिवस कसा जातो ते कळतही नाही. येथे जाण्यासाठी दोन रस्ते आहेत.
एक रस्ता मोलेम राष्ट्रीय उद्यानातून जातो आणि दुसरा मार्ग कुलेम रेल्वे स्टेशनपासून तीन किलोमीटरवर आहे. पहिल्या मार्गाने गेलात तर जंगल मार्ग असल्याने काही पक्षी व प्राणी बघायला मिळतात. मात्र हा रस्ता फक्त सप्टेंबर ते डिसेंबर या काळातच सुरु असतो. दुसरा मार्ग वेळ वाचवणारा व सोयिस्कर आहे.
या कॅनयाॅन बद्दल अनेक भुताखेतांच्या कथा तेथील स्थानिकांकडून ऐकायला मिळतात. या ठिकाणाला कोंकणी भाषेत “देवचाराचं कोंड” असेही म्हणतात. मोलेमच्या जंगलातील एका नदीच्या खोर्यात हे सुंदर ठिकाण आहे. टणक खडकाळ घळीतून वाहणार्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असतो. या वेगामुळेच येथे पोहण्याची परवानगी नाही. मात्र फोटोग्राफी आणि निसर्गाचा थरार अनुभवण्यासाठी येथे एकदा जायलाच हवं.
आपल्या भंडारदर्या जवळच्या सांधण व्हॅलीची आपणास येथे नक्कीच आठवण येईल. आपल्याला ठाऊक नसलेलं हे ठिकाण परदेशी पर्यटकांमध्ये मात्र लोकप्रिय आहे. काही परदेशी पर्यटक खास या डेव्हील कॅनयाॅनसाठी भारतात येतात. येथून जवळच तांबडी सुरला महादेव मंदिर आहे. गोव्यातील हे एकमेव कदंब कालिन मंदिर आहे. येथून जवळच प्रसिद्ध दूधसागर धबधबा आहे. या मनोहारी धबधब्यामुळे डेव्हील कॅनयाॅनची सहल एक यादगार सहल होऊ शकते.
कसे पोहचाल
गोव्याचे दाबोलीम विमानतळ अगदी जवळ आहे. तसेच मडगाव रेल्वे स्टेशनपासून टॅक्सीने पुढील प्रवास करता येतो. गोवा येथे वर्षभर पर्यटकांचा राबता असल्याने सर्व देशाभरातून रस्ते मार्गे येथे पोहचता येईल. नाशिककरांसाठी मंगला एक्सप्रेस सर्वात उत्तम तसेच नव्यानेच सुरु झालेले बेळगाव फ्लाईटही येथे जाण्यास उत्तम सोय आहे. बेळगाव येथून टॅक्सी मिळते.
कुठे रहाल
दक्षिण गोव्यात राहण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. होम स्टे, हाॅटेल्स, रिसाॅर्टस सर्वच मुबलक प्रमाणात आहेत.
Hatke Tourist Destination Devil Canyon Best Tourist Place Goa