मंडळी आपल्या देखो अपना देश या मालिकेत आपण आजवर अनेक वेगवेगळ्या हटके पर्यटन स्थळांविषयी जाणून घेतले. आज आपण खिद्रापूरच्या ज्या कोपेश्वर महादेव मंदिराबाबत माहिती घेणार आहोत ते आपल्या इतक्या नजिक असूनही अनेकांना या सुरेख मंदिराबाबत माहिती नाही हे नक्की…. चला तर मग आज कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूरला……
कोपेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात अगदी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आहे. शिरोळला सैनिकांचे गाव असेही म्हणतात. कारण येथील प्रत्येक घरातील किमान एकतरी तरुण सैन्यात देशसेवा करीत आहे. तसेच याठिकाणी कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम झाला असल्याने हा संपूर्ण परिसर वर्षभर हिरवागार व निसर्गरम्य दिसतो.
येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे कोपलेला अथवा रागावलेला. असे म्हणतात की, दक्ष कन्या सती हिच्या जाण्याने व तिच्या विरहाने महादेवाचा कोप झाला व तो येथे रागावून येवून बसला. म्हणून त्याला कोपेश्वर असे संबोधण्यात येते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. असे म्हणतात की, येथून १२ किलोमीटर वरील येडूर या गावात (कर्नाटक) येथे जे फक्त नंदीचे मंदिर आहे तोच या कोपेश्वर महादेवाचा नंदी आहे.
खिद्रापूरच्या या मंदिराच्या उभारणीची सुरवात अतिशय पुरातन म्हणजे साधारण सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत झाली असावी. नंतर अकराव्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पुर्णत्वास गेले. खिद्रापुरचे कोपेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे एक अजोड शिल्प मंदिर आहे. या मंदिराची स्थापत्यशैली कर्नाटकातील बेलूर व हळेबीडू येथील होयसाळ घराण्याने बांधलेल्या मंदिरांशी साम्य असलेली जाणवते. कारण या दोन्ही ठिकाणी मंदिर उभारणी दोन दगडांच्या मध्ये आधार म्हणून खोबणी किंवा कंगोरे यांचा आधार घेऊन इतर कुठलाही आधार न घेता दगडांची कलात्मक रचना करुन मंदिरे बांधली आहेत.
खिद्रापूरच्या या कोपेश्वर महादेव मंदिराचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने हे मंदिर संरक्षित शिल्पकला म्हणून घोषित केले आहे. या मंदिराच्या सुरवातीला ४८ कोरीव काम केलेल्या दगडी खांबावर तोलून धरलेला एक सभामंडप आहे. या मंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुर्ण मंडपाला छत नाही. या छताला एक गोल वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आलेली आहे. कारण या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम -हवनाच्या समिधांचा धूर बाहेर जाण्यासाठी ती जागा ठेवली आहे.
या सभा मंडपाचे वरील उघड्या गोलाकार छिद्रामुळे प्रथम छिद्रापूर व कालांतराने खिद्रापूर असे नाव झाले असावे असे म्हणतात. ते काहीही असले तरी या अप्रतिम कोरीव काम केलेल्या गोलाकार विनाछत सभा मंडपामुळेच हे मंदिर आज पर्यटक, छायाचित्रकार, इतिहास प्रेमींना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. हे सभामंडपाचे दालन पाहतांना यातील कमळाकृती छत, खांबावरील पाने, फुले, हत्ती, नर्तकी या कोरीव कामामुळे आपण सुरवातीलाच मंदिराच्या प्रेमात पडतो.
या नंतरचा मंदिराचा मुख्य भाग म्हणजे गर्भगृह. हे मंदिर तारकाकृती आकारात बांधण्यात आलेले आहे. संपुर्ण मंदिर हे दगडावरील नक्षीकामाचा अप्रतिम नमुना आहे. मंदिराच्या कोणत्याही भागावरील कोरीवकाम बघून नजर हटत नाही. मुळ गाभार्यात शिवलिंग आहे. तसेच तीन दगडी कमानी आहेत मात्र तेथील आसनांवर मुर्ती नाहित. संपुर्ण मंदिर एकशे आठ हत्तींच्या पाठीवर आहे.
हत्तींच्या वरील रांगेत देव , यक्ष , यक्षिणी यांच्या मोहक रुपातील मुर्ती आहेत. मंदिराच्या आत व बाहेरही अनेक नर्तक, नर्तकी, गज, वादक व शिल्पांची उधळण दिसून येते. यावरुन तत्कालीन स्थानिक धार्मिक-सांस्कृतिक परंपरा, सण व राजांचा वैभवशाली कालखंड यांचा सुंदर मिलाप सर्वत्र पहावयास मिळतो. मंदिर बांधकामास शेकडो वर्षांचा कालावधी लोटला असूनही यादरम्यान ऊन-वारा व पावसाचा मारा खात हे दुर्मिळ मंदिर व आकृतीशिल्पे इतिहासाची साक्ष देत उभी आहेत. हे मंदिर आतूनच नव्हे तर बाहेरूनही सुंदर अशा कोरीव कामाने सजलेले आहे. मंदिर प्रदक्षिणेच्या मार्गावर आखीव रेखीव मानवी आकृती कोरल्या आहेत. मंदिराच्या पायावर सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत.
असे हे संपूर्ण मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. येथिल शिल्पे , शिल्पजडीत खांब , नक्षीदार खिडक्या , जिंवत वाटणार्या मूर्ती , गवाक्ष व इतर गोष्टी प्रत्यक्ष तिथे जाऊनच बघायला हव्यात कारण याचे शब्दात वर्णन करणे म्हणजे या अजरामर शिल्पकलेवर अन्याय होईल असे वाटते. कारण आजही हे अजोड काम दुर्लक्षित आहे, किमान आतातरी या कामास न्याय मिळावा असे वाटते. मध्यंतरी “कट्यार काळजात घुसली” या मराठी चित्रपटाचे ‘शिव भोला भंडारी’ या गाण्याचे चित्रिकरण या मंदिरात झाल्यामुळे पुर्वी काहिशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. चला तर मग येताय ना अशा या अनोख्या खिद्रापुरला महादेव मंदिरास भेट द्यायला…..
कसे जाल
खिद्रापूर हे कोल्हापूर येथून ६० किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर शहर रेल्वे व काही मर्यादित विमान सेवांनी जोडलेले आहे. जवळचा गजबजलेला विमानतळ तसा गोवा येथे २२५ कीमी अंतरावर आहे. तसेच कोल्हापूर हे पुणे-बंगळुरू हायवेवर असल्याने भारतातील सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे.
कुठे रहाल
खिद्रापूर हे छोटे गाव असल्याने येथे राहण्याची चांगली सोय नाही. परंतु कोल्हापूर येथे सर्व दर्जाची हाॅटेल्स उपलब्ध आहेत.
नजिकची पर्यटन स्थळे
जैन मंदिर खिद्रापूर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, शालिनी पॅलेस व कणेरीमठ, नरसोबाची वाडी, सज्जनगड, ज्योतिबा मंदिर, समर्थ स्थापित अकरा मारोती मंदिरे इ.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!