कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती
मुंबई – राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रिय १३ लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरण पध्दतीने (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार आजपर्यंत ११ लाख १० हजार ९२९ नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
३० एप्रिलअखेर १६६ कोटी ६३ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीही कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत नोंदित बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली होती, असे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
सध्या राज्यात १५ मे २०२१ पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे इमारत व इतर बांधकामे तसेच इतर कामगारवर्गाची कामे पूर्ववत सुरू झालेली नसल्याने कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित कामगारांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू असून कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली