इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुरुग्राममधून शेकडो वाहनांमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्तेही नलहुद शिव मंदिर नूह येथे भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी गेले होते. दरम्यान नूंहमध्ये ब्रज मंडल यात्रेवर दुसऱ्या समाजाच्या लोकांनी दगडफेक केली आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. तिथल्या गाड्यांना आग लावली आहे. या तणावामुळे मंदिर परिसरात ५००० हून अधिक लोक अडकले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक प्रताप सिंह हे देखील आहेत. यात्रा शिवमंदिर नळ हुड येथे पोहोचताच एका समाजाच्या समाजकंटक लोकांनी यात्रेवर दगडफेक केली. अनेक वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड केली. हा हल्ला अचानक करण्यात आल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे गुरुग्रामचे जिल्हाध्यक्ष अजित सिंह यांनी केला आहे. पोलिस अद्याप काहीही बोलण्यास तयार नाहीत. किती जण जखमी झालेत याची माहितीही देण्यात आलेली नाही. या हल्ल्यादरम्यान गोळीबारही झाल्याचे वृत्त आहे. जवळच्या गावातील विशिष्ट समाजाचे लोक तलवारी आणि खंजीर घेऊन नुह येथे पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पोलिसांनी बाजारपेठ बंद ठेवली आहे. परिस्थिती पाहता नूह तसेच गुरुग्राम आणि पलवलमधील पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
इंटरनेट सेवा बंद, जिल्ह्याच्या सीमा सील
दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर तीन डझनहून अधिक वाहने जाळण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये अनेक लोक आणि पोलीस जखमी झाले. गोळी लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. तथापि, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. नूंह जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा सामना करण्यासाठी इतर जिल्ह्यांमधून पोलिस दलाला पाचारण केले आहे, संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्याबरोबरच दोन दिवस इंटरनेटही बंद ठेवण्यात आले होते. जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.