नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल येथे १५ लाख ३० हजार रुपये किमतीच्या बनावट १०.२६.२६ खताच्या २४० बॅगांचा साठा कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी हरसुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील भरारी पथकाला १५ जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पथकप्रमुख संजय शेवाळे (कृषी विकास अधिकारी), जगन सूर्यवंशी (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक), कल्याण पाटील (विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक), रामा दिघे (कृषी अधिकारी), आणि पोलिस उपनिरीक्षक मोहित मोरे यांच्या सहाय्याने आयशर कंपनीच्या संशयित वाहनाची (क्रमांक MH15 FV7717) तपासणी केली. यात पॅरादिप फॉस्फेट लिमिटेडच्या नावाने बनावट खताच्या बॅगा आढळल्या.
जप्त केलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, हरसुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अभिमन्यु काशिद यांचे मार्गदर्शन लाभले.
शेतकऱ्यांना बनावट आणि दुय्यम दर्जाची खते विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी घरपोहोच खते खरेदी करू नये, सिलबंद बॅगांवरील माहिती कायद्यानुसार तपासावी आणि अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या बिलासह खरेदी करावी, असे आवाहन सुभाष काटकर यांनी केले आहे.