नाशिक : हरसूल येथील मोबाईल व्यावसायीकाच्या खूनाचा उलगडा झाला असून ही हत्या किरकोळ कारणातून झाल्याचे समोर आले आहे. ग्रामिण पोलिसांना यश आले या खूनाचा उलगडा करुन दोन जणांना गजाआड केले आहे. ही घटना विराचापाडा शिवारात घडली होती. याप्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. किशोर शंकर भसरे (२३ रा.डोळओहोळ ता.त्र्यंबकेश्वर) व प्रविण नरहरी चौधरी (२० रा.बेहेडमळा ता.त्र्यंबकेश्वर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हरसूल पोलिस ठाणे हद्दीतील विराचापाडा शिवारात परशराम देवराम भोये (२९ रा.उंबरपाडा ता.त्र्यंबकेश्वर) या युवकाचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात अज्ञात मारेक-यांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस तपासात मृत तरूण मोबाईल व्यावसायीक असल्याचे समोर आले होते. हरसूल येथे त्याचे मोबाईल दुरूस्ती आणि विक्रीचे दुकान असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याच्या राहणीमानासह चौकशी केली असता तो घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास आपले दुकान वाढवून दुचाकीवरून उंबरपाडा गावाच्या दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकांनी तपास करून गुप्त माहितीगाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघा संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुह्याची कबुली दिली. संशयितांनी किरकोळ भांडणाची कुरापत काढून भोये यास दगडाने ठेचून निर्घुन हत्या केल्याचे समोर आले असून अधिक तपास हरसूलचे सहाय्यक निरीक्ष गणेश वारूळे करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील व सहाय्यक निरीक्षक वारूळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दिलीप बोडके,हवालदार सुनिल तुंगार, पोलिस नाईक मेघराज जाधव,शिपाई विलास जाधव,निलेश जाधव तसेच एलसीबीचे सहाय्यक निरीक्षक मयुर बामरे,उपनिरीक्षक नाना शिरोळे, जमादार शिवाजी ठोंबरे,हवालदार वसंत खांडवी,प्रकाश तुपलोंढे,प्रदिप बहिरम,हेमंत गिलबिले आदींच्या पथकाने केली. हा गुन्हा तात्काळ उघडकीस आणल्याबद्दल अधिक्षक शहाजी उमाप यांनी पथकास पंधरा हजार रूपयांचे बक्षीस जाहिर केले आहे.