मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. आज माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. या अगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार गटात जाण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा पक्षप्रवेश सोहळा आज इंदापूरमध्ये झाला. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह अनेक नेते उपस्थितीत होते. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे अजित पवार गटाला व भाजपला मोठा धक्का पश्चिम महाराष्ट्रात बसला आहे. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटात इंदापूरमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांची अगोदर घेतली होती भेट
मी निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचे सांगितले. दुसरा पर्याय काढू असे त्यांनी आश्वासन दिले. पण, दुसरा पर्याय स्वीकारणे कार्यकर्त्याला मान्य झाले नसते, व्यक्तीगत तो निर्णय योग्य ठरला असता. पण, जनतेचा प्रश्न असतो असे पाटील म्हणाले.
अशी झाली अडचण
हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. पण, ऱाष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपबरोबर युती केल्यामुळे ही इंदापुर विधानसभेची जागा त्यांच्या पक्षाला सुटणार असल्यामुळे त्यांची अडचण झाली. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. इंदापुर मतदार संघात अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रेय भरणे आहे. त्यांच्या विरोधात आता हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाकडून रिंगणात उतरणार आहे.