इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या “नाशिक स्वच्छतेचा हरित कुंभ” या उपक्रमाचा भव्य शुभारंभ रविवारी २ मार्च रोजी करण्यात आला. स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ अनुषंगाने आयोजित या उपक्रमाचा प्रारंभ नाशिक वुमन्स वॉकेथॉन कार्यक्रमात आमदार सीमाताई हिरे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या उपस्थितीत झाला.
संपूर्ण शहर होणार हरित क्रांतीचा साक्षीदार!
“नाशिक स्वच्छतेचा हरित कुंभ” या उपक्रमांतर्गत ८ ते १८ मार्च या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल ६० लाख रुपयांची बक्षिसे २,५०० विजेत्यांना दिली जाणार असून, प्रत्येक स्पर्धेतील विजेत्याला १०,००० रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळणार आहे.
स्पर्धांमध्ये सहभागी व्हा आणि जिंका लाखोंची बक्षिसे!
या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या nmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध QR कोड स्कॅन करून स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल.
स्पर्धांचा रोमहर्षक थरार!
उपक्रमांतर्गत नागरिक, विद्यार्थी, स्वच्छता कर्मचारी आणि महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, जसे की –
✔ उत्कृष्ट कचरा वर्गीकरण करणाऱ्या नागरिकांसाठी स्पर्धा
✔ शाळांसाठी प्लास्टिक कचरा संकलन व जनजागृती स्पर्धा
✔ “Waste to Best” स्पर्धा
✔ सर्वोत्कृष्ट होम कंपोस्टिंग व कचरा प्रक्रिया स्पर्धा
✔ शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा
✔ स्वच्छता रिल्स स्पर्धा
✔ उत्कृष्ट घंटागाडी कर्मचारी स्पर्धा
✔ उत्कृष्ट महिला सफाई कर्मचारी व कचरा वेचक महिला स्पर्धा
विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश!
उद्घाटन सोहळ्यात मनपा शाळा क्र. 49, पंचक आणि नूतन मराठी प्राथमिक विद्यामंदिर या शाळांच्या विद्यार्थ्यांनी “गोदावरी स्वच्छता” या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.
महिला व नागरिकांचा सक्रिय सहभाग!
कार्यक्रमाच्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेने माहिती व जनजागृतीसाठी विशेष स्टॉल लावला होता. या स्टॉलद्वारे वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या हजारो महिलांना ओला व सुका कचरा वर्गीकरणाविषयी माहितीपत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली.
स्वच्छतेसाठी सर्वांचे योगदान आवश्यक – महापालिका आयुक्तांचे आवाहन
महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी “शहर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि हरित उपक्रमांना चालना द्यावी,” असे आवाहन केले.
स्वच्छतेच्या दिशेने नाशिककरांकडून मनपा प्रशासनाची अपेक्षा!
“नाशिक स्वच्छतेचा हरित कुंभ” हा उपक्रम शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी या कार्यक्रमात केले आहे.
नाशिक शहराच्या स्वच्छतेसाठी हा एक मोठा सकारात्मक टप्पा ठरणार असून, संपूर्ण शहर हरित क्रांतीचा साक्षीदार व्हावा अशी अपेक्षाआयुक्त मनिषा खत्री यांनी व्यक्त केली व स्वच्छ भारत अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.