देशभरात कोरोनाने घातलेले थैमान आणि येथील तिसऱ्या शाहीस्नानानंतर कोलमडून पडलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर साधू संतांच्या प्रमुख आखाड्यांनी हरिद्वार कुंभमेळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या तेराही आखाड्यांचा समावेश असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेची बैठक होत असून त्यात औपचारिक घोषणा होणार आहे. तशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
स्थगितीबाबतचे वृत्त सर्वप्रथम इंडिया दर्पणने दिले आणि त्यानंतर महाराष्ट्रासह देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी सकाळपासून डिजिटल आवृत्त्यांमध्ये बातम्या देऊन चिंता व्यक्त केली होती. कुंभमेळा स्थगितीबाबत निर्णय शासनाने घ्यावा की आखाडा परिषदेने याबाबत दिवसभर साधूंमध्ये चर्चा होत राहिल्या. अखेर आज सायंकाळी शैवांच्या श्रीनिरंजनी आखाड्याची बैठक मन्सादेवीचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरीजी महाराज आणि पंच यांच्या अध्यक्षतेखाली झाली. देशातील कोरोना उद्रेक पाहता, केवळ शाहीस्नानाच्या परंपरेला चिकटून राहणे योग्य नाही. साधू महंत आणि धर्ममार्तंडांनी धर्म-प्रजेचे हित अगोदर पाहिले पाहिजे, असा चर्चेचा सूर होता. उद्या देवतांना नैवेद्य दाखवून आखाड्याचे साधू परततील. अशाच प्रकारचा निर्णय आनंद आणि महानिर्वाणी आखाड्याने घेतला असून त्यांचे साधू देखील उद्या हरिद्वार सोडतील. दरम्यान, अटल आखाड्याच्या साधुंनी आज सायंकाळीच हरिद्वार सोडले आहे.
शैवांच्या सर्वात मोठ्या जुना आखाड्याची बैठक उद्या (१६ एप्रिल) आचार्य महामण्डलेश्वर स्वामी अवधेशानंद आणि पंच ह्यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी नरेंद्रगिरी यांची रुग्णालयात भेट घेऊन ते आपला निर्णय जाहीर करतील. सध्या आखाड्यांच्या छावण्यांसमोर मालट्रक उभे असून सामानांची बांधाबांध सुरू आहे. दरम्यान, साधू-महंतांच्या या निर्णयामुळे सरकार आणि प्रशासन यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
वैष्णव आखाड्यांचा निर्णय उद्या
हनुमान जयंती म्हणजे २७ एप्रिलच्या शाहीस्नानासाठी वैष्णव आखाडे आग्रही होते. मात्र तिसऱ्या शाहीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्मोही आखाड्याचे श्रीमहंत राजेंद्रदास आणि निर्वाणी आखाड्याचे श्रीमहंत धर्मदास यांनी कुंभ स्थगितीचा निर्णय सर्वात मोठ्या असलेल्या दिगंबर अखाड्याला म्हणजे श्रीमहंत रामकिशोर दास यांना कळविल्याचे समजते. या तिन्ही आखाड्यांचे मिळून लक्षावधी साधू आहेत. हा निर्णय उद्या झाल्यास हरिद्वार रिकामे होईल आणि उर्वरित भाविकही आपापल्या राज्यांत परततील.
तिसऱ्या शाही स्नानाला (१४ एप्रिल) देशभरातून १३ ते १५ लाख भाविक आले होते. पण आज संपूर्ण हरिद्वार मध्ये शुकशुकाट होता. गंगेच्या काठावर क्वचित कोणी फिरकले नसल्याचेही दिसून आले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!