विशेष प्रतिनिधी, हरिद्वार
साधू-महंतांच्या तिसऱ्या शाहीस्नानानंतर आणि त्यासाठी जमलेल्या देशभरातील लक्षावधी भाविकांच्या उपस्थितीमुळे येथे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे चौथ्या आणि अखेरच्या शाहीस्नानाची वाट न पाहता तत्काळ हरिद्वारचा कुंभमेळा स्थगित करावा, अशी मागणी देशभरातून होत आहे. मात्र, हा निर्णय जाहीर कोणी करावा हा प्रश्न नाजूक अवस्थेत येऊन थांबला आहे. साधूंच्या १३ आखड्यामध्ये याबाबत मतांतरे दिसून येत आहेत. तर, प्रशासनाने साधूंकडेच अंगुलिनिर्देश केला आहे. त्यामुळे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
कुंभमेळ्याचे आयोजन आणि स्नान मुहूर्त निश्चिती अखिल भारतीय आखाडा परिषद करीत असते. त्याप्रमाणे यंदा महाशिवरात्रीला कुंभ सुरू झाला. यंदा हनुमान जयंतीला (२७ एप्रिल) चौथे शाहीस्नान होणार आहे. वैष्णव आखाड्यांच्या आग्रहामुळे हा निर्णय घ्यावा लागला असे सांगण्यात येते. त्यामुळे चौथे शाहीस्नान रद्द करून कुंभमेळाच स्थगित केला तर वैष्णव नाराज होतील आणि आखाडा परिषदेअंतर्गत मोठा संघर्ष निर्माण होईल अशी रास्त भीती परिषदेला वाटते. म्हणून संसर्गजन्य आजार आणि कायदा-सुव्यवस्था लक्षात घेऊन शासन पातळीवर स्थगितीचा निर्णय जाहीर करावा, अशी चर्चा परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. तर दुसरीकडे कुंभ स्थगित केला तर देशभरातील साधू आणि भाविकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी शासनाला भीती वाटते. त्यामुळे प्रस्ताव साधुंकडून यावा याची प्रशासन वाट पाहत आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की, तीन स्नाने आणि भाविकांची अलोट गर्दी पाहता भाविकांबरोबरच हजारो साधू कोरोनाग्रस्त झाले आहेत. अगदी आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी नरेंद्रगिरी सध्या आयसीयू मध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक व्यक्तींसोबत निकटता असलेले स्वामी नरेंद्रगिरीच सध्या उपचार घेत असल्याने कुंभमेळ्याचा निर्णय नक्की कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
इकडे अन्य धर्मियांच्या मेळाव्याची तुलना करण्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री मश्गुल आहेत. वेळीच आणि तत्काळ निर्णय घेतला नाही तर संपूर्ण हरिद्वारचेच हॉस्पिटलमध्ये रूपांतर होईल. आणि हे सर्व भाविक आपापल्या राज्यांत परतले तर कहरच होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. कुंभाचा प्राचीन इतिहास पाहता यापूर्वी विसाव्या शतकाच्या प्रारंभी प्लेगच्या साथीमुळे आणि महायुद्ध काळात कुंभस्नान स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे आता काय निर्णय होणार आणि तो कोण घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
बघा, शाहीस्नानापूर्वी शाही मिरवणुकीतील अलोट गर्दीचा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=461632744892080