इगतपुरी – सरळसेवा प्रविष्ठ वर्ग १ अभियांत्रिकी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इंजि. हरिभाऊ कारभारी गिते यांची जिल्हा संधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग नाशिक ह्या पदावर बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. मृद व जलसंधारण विभागाने आज काढलेल्या आदेशानुसार ते या पदावर रुजू झाले आहेत. जिल्हा जलसंधारण अधिकारी, अकोला आणि जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वी कामकाज पाहिले आहे. इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या निर्मितीमध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना घडवणारी त्यांची ५५ पेक्षा जास्त पुस्तके राज्यभर विद्यार्थीप्रिय आहेत. नाशिकच्या पदावर बदली झाल्याने त्यांच्या समृद्ध अनुभवांचा नाशिक जिल्हा वासीयांना मोठा फायदा होणार आहे.
इंजि. हरिभाऊ कारभारी गीते हे जलसंधारण आणि अभियांत्रिकी क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये अव्वल अधिकारी म्हणून प्रख्यात आहेत. शासकीय कामकाज सांभाळून त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी यशस्वी करणारी ५५ पेक्षा जास्त पुस्तके लिहिलेली आहेत. यासह त्यांनी कृषिक्षेत्रात विविधांगी प्रयोग करून शेतीमध्ये सुद्धा विक्रमी यश संपादन केले आहे. अभियांत्रिकी अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतांना त्यांनी शासनाकडून अभियंत्यांच्या समस्या सुद्धा सोडवलेल्या आहेत. यासह राज्याचे जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांचे विशेष कार्य अधिकारी, अकोला जिल्हा जलसंधारण अधिकारी, वाकी खापरी धरणाचे सहाय्यक अभियंता आदी पदांवर काम करून लक्ष्यवेधी कामगिरी केली आहे. यासह त्यांचा महाराष्ट्रभर जनसंपर्क असून त्या माध्यमातून ते नेहमीच लोकांना योग्य मार्गदर्शन करीत असतात. त्यांनी आज जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग नाशिक ह्या पदाची सूत्रे हाती घेतली. विविध अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांनी त्यांना नव्या जबाबदारीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.