इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात पोहोचलेल्या असतात. यातील कलाकार हे प्रेक्षकांच्या अत्यंत जवळचे होऊन जातात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील कोणताही प्रसंग हा प्रेक्षकांना जवळचा वाटतो. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा आणि पाठक बाई लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. लवकरच त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर होणार आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू आहे. हार्दिक जोशीच्या केळवणाचा फोटो समोर आला असून या फोटोतून लग्नाच्या तारखेबद्दल खुलासा झाला आहे.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या केळवणाचे आणि बॅचलर पार्टीचे फोटो समोर आले होते. त्यानंतर हल्लीच अक्षया देवधरचा नववधूच्या वेशातील एक व्हिडीओ देखील समोर आला होता. त्यावर अनेक चाहत्यांनी लग्न कधी करताय? असा प्रश्न विचारला होता. आता हार्दिक जोशीच्या एका मैत्रिणीने पोस्ट केलेल्या फोटोमुळे त्या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
हार्दिक जोशी हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ‘घरचं केळवण’ अशी कॅप्शन त्याला दिली आहे. पारंपारिक वेशात सजलेल्या हार्दिकसमोर पंचपक्वानांनी भरलेले ताट दिसते आहे. हार्दिकच्या मैत्रिणीने शनिवारी २६ नोव्हेंबरला इन्स्टाग्राम स्टेटसवर हा फोटो शेअर केला. यात तिने हार्दिक जोशीला टॅग केले होते. त्याबरोबरच ‘फक्त ६ दिवस शिल्लक’ असा हॅशटॅगही शेअर केला होता. हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोनंतर अनेक चाहत्यांनी लग्नाच्या तारखेचा अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर येत्या १ किंवा २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते दोघेही पुण्यात विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.
Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding Plan