इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अलीकडच्या काळातील राजकारण पाहून लोकांमध्ये राजकारणी नेत्यांबद्दल तीव्र नाराजी आहे. त्यामुळे नेत्यांविरोधात त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटताना आपण पाहतो. अशीच एक घटना नुकतीच हरयाणामध्ये घडली. पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करायला गेलेल्या एका नेत्याला एका महिलेने चक्क थोबाडीत लगावली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
काय आहे प्रकरण?
हरियाणातील कैथलमध्ये जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार ईश्वर सिंह चीका परिसरातील गुहला गावात पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, एवढ्या उशिरा आल्याचा राग यावेळी नागरिकांमध्ये दिसला. गर्दीतून आलेल्या एका महिलेनं ईश्वर सिंह यांना चापट मारली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एवढंच नव्हे तर येथील लोकांनी संबंधित आमदारासह कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीही केली आहे. ‘तू आता कशाला आला?’ असा सवालही पूरग्रस्त महिलेनं विचारला आहे. मुसळधार पावसामुळे कैथल येथील घग्गर नदीवरील बंधारा फुटला आहे. यामुळे चीका येथील काही गावात पूरस्थिती आहे. याच पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार ईश्वर सिंह गुहला गावात आले होते. यावेळी एका महिलेनं आमदाराच्या कानशिलात लगावली.
आमदार म्हणाले
सत्ताधारी पक्षातील आमदाराला महिलेनं कानशिलात लगावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर जेजेपीचे आमदार ईश्वर सिंह यांनी मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात मी कुठलंही कायदेशीर पाऊल उचलणार नाही. मी तिला माफ करतो, अशी ‘एएनआय’ला दिली.