नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा संकल्प साकार करण्यासाठी जल जीवन मिशन व्यापक आणि वेगाने राबवण्यात येत आहे. आज या अभियानाने, २३ महिन्याच्या अल्प काळात, भारतातल्या १ लाख गावांतल्या प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची कामगिरी साध्य केली आहे. या महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या सुरवातीला देशातल्या १८.९४ कोटी ग्रामीण घरांपैकी केवळ ३.२३ कोटी (१७ %) घरांमधेच नळ जोडणी होती. कोविड-19 महामारी आणि लॉक डाऊन यासारख्या आव्हानात्मक काळातही जल जीवन मिशनने २३ महिन्यांच्या काळात ४.४९ कोटी नळ जोडण्या दिल्या आहेत. त्याच बरोबर ५० हजार ग्राम पंचायतीमधल्या प्रत्येक घराला नळा द्वारे पाणीपुरवठा करत या ग्राम पंचायतींमध्ये ‘हर घर जल’ साध्य केले आहे.
२०२१-२२ मध्ये, १५ व्या वित्त आयोगाचे बंधित अनुदान म्हणून राज्यांना, स्थानिक संस्था आणि पीआरआयकरिता पाणी आणि स्वच्छता यासाठी २६,९४० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. २०२५-२६ पर्यंत म्हणजेच येत्या पाच वर्षासाठी १,४२,०८४4 कोटी रुपयांचा निधी सुनिश्चित करण्यात आला आहे. देशाच्या ग्रामीण भागातल्या या प्रचंड मोठ्या गुंतवणुकीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळ णार आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत.
जल जीवन अभियानाचा बॉटम अप दृष्टीकोन असून नियोजनापासून ते अंमलबजावणी, व्यवस्थापन,आणि देखभाली पर्यंत समुदायाची महत्वाची भूमिका आहे. हे साध्य करण्यासाठी राज्य सरकारांनी गाव जल आणि स्वच्छता समित्या, पाणी समित्या बळकट करणे, येत्या पाच वर्षासाठी गाव कृती आराखडा विकसित करणे यासारखी कामे हाती घेण्याबरोबरच जनतेमध्ये जागृती करायची आहे. आतापर्यंत भारतात २.६७ लाख गाव जल आणि स्वच्छता समित्या,स्थापन करण्यात आल्या असून १.८४ लाख ग्राम कृती आराखडे विकसित करण्यात आले आहेत.