अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
परस्पर सौहार्द आणि बंधुभावाचे उदाहरण बिहारची राजधानी पाटणा येथे पाहायला मिळाले. रविवारी पाटण्यातील हनुमान मंदिराने अजानच्या वेळी लाऊडस्पीकर बंद केले. मशीद आणि मंदिरातील अंतर ५० मीटर आहे. एकमेकांबद्दल आदर व्यक्त करतानाच मंदिरात येणाऱ्या भाविकांची मशिदीतल्या लोकांनीही काळजी घेतली. राज्यात लाऊडस्पीकरची चर्चा जोरात सुरू असताना हे दृश्य पाहायला मिळाले आहे.
उत्तर प्रदेशप्रमाणेच बिहारमध्येही लाऊडस्पीकर हटवण्याची भाजपची मागणी आहे. नितीश सरकारमधील मंत्री जनक राम यांनी मशिदींमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरवर आक्षेप घेतला होता. मशिदीतून लाऊडस्पीकरवरून येणारा मोठा आवाज बंद करण्याबाबत त्यांनी बोलले होते. ते म्हणाले होते की, होळी, दिवाळीत डीजे आणि वेगवान वाहनांना बंदी घालता येईल, तर मशिदीतील लाऊडस्पीकरवरही अजान बंद करावी. लोकप्रतिनिधी असल्याने माझ्याकडे याबाबत तक्रारी येत असतात.
राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे मत याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. आपल्या विचारांची सर्वांना जाणीव आहे असे ते म्हणतात. आम्ही कधीही कोणत्याही धर्मात ढवळाढवळ करत नाही. यापूर्वी त्यांनी लाऊडस्पीकर काढणे हा मूर्खपणा असल्याचे म्हटले होते. बिहारमधील धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत बोलण्यात अर्थ नाही, असे ते म्हणाले होते. प्रत्येकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
महाराष्ट्रातही सध्या लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. हिंदू – मुस्लिम समुदायातून काहीशी धार्मिक तेढही त्यामुळे निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषयी इशाराही दिला आहे. ३ मेपर्यंत मशिदींवरचे लाऊडस्पीकर काढा नाहीतर समोरच हनुमानचालिसा लावू असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे धार्मिकतेबरोबरच राजकीय वातावरणही काहीसे तणावाचे झाले आहे. म्हणूनच बिहारमधले बंधुभावाचे उदाहरण आदर्शवत ठरत आहे.
https://twitter.com/ANI/status/1520631527494676481?s=20&t=PluMUKvBKZvuntmAlfNDjA