नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पवनपुत्र हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला याविषयावरुन आयोजित शास्रार्थ सभेत आज चांगलाच गोंधळ झाला. नाशिकजवळील अंजनेरी येथे हनुमानाचा जन्म झाला नसून कर्नाटकातील किष्किंधा येथे झाल्याचा दावा महंत गोविंदानंद महाराज यांनी केला होता. अंजनेरी येथे हनुमानाचा जन्म झाल्याचा पुरावा द्या, असे आव्हान त्यांनी केले होते. तसेच यासंदर्भातच त्यांनी नाशिकरोड येथे शास्त्रार्थ सभा आयोजित केली होती. आज या सभेत मात्र प्रचंड गोंधळ झाला.
सभेच्या प्रारंभीच साधु, महंतांमध्ये नाट्य रंगले. साधू-महंतांच्या बसण्यावरुन वाद झाला. त्यामुळे काही काळ सभा थांबविण्यात आली. तेथूनच ही सभा वादळी होणार असे स्पष्ट झाले. सभा सुरू झाली आणि साधू-महंतांमध्ये वादविवाद सुरू झाले. रामजन्मभूमीचे प्रधानाचार्य यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सभा सुरू झाली. सभेत चर्चेला सुरू होताच पुन्हा साधूंमध्ये वाद निर्माण झाला. हनुमानजन्मस्थळा ऐवजी अन्य विषयांवरच साधू-महंत वाद घालत असल्याचे दिसून आले. खासकरुन गोविंदानंद महाराज आणि नाशिकमधील साधू-महंत यांच्यात शाब्दिक वादंग सुरू झाले.
नाशिकचे महंत सुधीरदास यांनी काँग्रेसी म्हटल्याचा राग गोविंदानंद महाराज यांना आला. त्यांनी तशी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. तसेच, जगदगुरू शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनाही काँग्रेसी म्हटल्याचा आरोप गोविंदानंद यांनी केला. मात्र, आपण असे कुठलेही वक्तव्य केले नसल्याचे महंत सुधीरदास म्हणाले.
सभेत वाधू-महंतांमध्ये वादविवाद सुरू असतानाच उपस्थित महंतांनी हातात बूम घेऊन तो गोविंदानंद महाराजांवर उगारला. त्यामुळे सभेत आणखीनच मोठा गोंधळ निर्माण झाला. गोविंदानंद महाराज उभे राहून आक्रोश करु लागले. तर, अन्य महंत आणि साधूंमध्येही वाद सुरू झाला. त्यामुळे सभेतील हा मोठा राडा पाहून अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी येथे येत मध्यस्थी केली. दोन्ही बाजूच्या साधू-महंतांना शांततेचे आवाहन केले. आणि ही सभा संपुष्टात आली. मात्र, हनुमान जन्मस्थळाचा मुद्दा तसाच राहिला. कुठल्याही निर्णयाविना ही सभा संपुष्टात आली.
बघा, या सभेचा व्हिडिओ