इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अंजनीपुत्र हनुमान जन्मस्थळाच्या वादात आता कर्नाटक सरकारने उडी घेतली आहे. हनुमानाचा जन्म कर्नाटकमध्ये झाल्याचा दावा करीत सरकारने भव्य हनुमान मंदिर बांधण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हे मंदिर अंजेनाद्री पर्वतावर बांधले जाईल, जिथे हनुमानाचा जन्म झाला असे मानले जाते. हे मंदिर अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिराच्या धर्तीवर बांधले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये मे २०२३ च्या आधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत या मंदिराचा फायदा भाजपला निवडणुकीत घ्यायचा आहे.
हनुमानाच्या खऱ्या जन्मस्थानावरून कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये गदारोळ सुरू असताना ही घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे हनुमानाचा जन्म राज्याच्या उत्तरेकडील हम्पीजवळील किष्किंधा येथील अंजेयानंद्री टेकडीवर झाल्याचा कर्नाटकचा दावा आहे. खरे तर कर्नाटकातील भाजप सरकारला अयोध्येतील राम मंदिराला पर्यटन कॉरिडॉरच्या माध्यमातून येथील हनुमान मंदिराशी जोडायचे आहे. त्यासाठी हे हनुमान मंदिर आणखी भव्य बनवण्याची योजना आहे. हे मंदिर तुंगभंद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि जागतिक वारसा हम्पीपासून अवघ्या २० किमी अंतरावर आहे. हम्पी हे रामायणातील किष्किंधा आहे, तिथे माकडांचे राज्य होते असे मानले जाते.
या प्रकल्पांतर्गत रस्त्यांची व्यवस्था करून या मंदिराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचीही चर्चा आहे. शनिवारी यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार या प्रकल्पासाठी ६० एकर जमीन लागणार आहे. त्यात शेतकऱ्यांच्या मालकीच्या ५८ एकर खासगी जमिनीचाही समावेश आहे. ही जमीन कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळामार्फत शेतकऱ्यांच्या संमतीने घेण्याचेही आदेशात म्हटले आहे. स्वत: मुख्यमंत्री बोम्मई या प्रकल्पात वैयक्तिक रस घेत असून त्यांनी अनेकवेळा बैठका घेतल्या आहेत. १५ जुलैनंतर दुसऱ्या आढावा बैठकीसाठी या ठिकाणी भेट देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
डिसेंबर २०२० मध्ये, तिरुमाला तिरुपती देवस्थानम यांनी आंध्र प्रदेशातील विविध मंदिरांवर देखरेख करणार्या तज्ज्ञांचे पॅनेल तयार केले होते. त्यात वैदिक विद्वान, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इस्रोचे शास्त्रज्ञ यांचाही समावेश होता. अहवालात हनुमान स्थानाबाबत दावा करण्यात आला आहे. नंतर एप्रिल २०२१ मध्ये समितीने दावा केला की, हनुमानाचा जन्म आंध्र प्रदेशातील अंजनाद्री पर्वतावर झाला होता. त्यामागील समजुतींसह ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक पुरावेही दिले गेले आहेत.
त्याचवेळी कर्नाटकातील विविध मंत्री हंपीजवळील अंजेनाद्री पर्वताचे वर्णन रामायणात असल्याचे सांगतात. त्यानुसार याच ठिकाणी राम आणि लक्ष्मण यांची रामायणात हनुमानाशी भेट झाली. येथे हनुमानासह राम, सीता आणि अंजना देवी यांचीही मूर्ती आहे. तर, महाराष्ट्रातील नाशिक जवळील अंजनेरी येथे हनुमानाचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात नुकताच मोठा वाद झाला होता. साधू-महंतांची बैठकही झाली आणि ती वादळी ठरली होती.
hanuman birthplace conflict karnataka government decision