नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), ज्या कंपनीने अत्यंत प्रतिष्ठेचा महारत्न दर्जा प्राप्त केला आहे, आणि हा दर्जा मिळवणारा भारतातील १४ वी केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून नावलौकिक मिळवला आहे. भारतीय एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या एचएएल ने हा मैलाचा दगड गाठून लक्षणीय कामगिरी केली आहे. वित्त सचिवांच्या नेतृत्वाखालील आंतर-मंत्रालयीन समिती (आयएमसी) आणि कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च समिती या दोघांच्या शिफारशींनंतर अर्थमंत्र्यांनी याला मान्यता दिली आहे.
महारत्न दर्जा विषयी :
केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना जागतिक नेतृत्व करण्यासाठी अधिक सक्षम करून त्यांच्या या प्रवासात स्पर्धात्मक लाभ मिळावेत आणि त्यांना पाठिंबा द्यावा या उद्देशाने सरकारने १९९७ मध्ये ‘नवरत्न’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत, ‘नवरत्न’ दर्जा मिळालेल्या सीपीएसई ना भांडवली खर्च, संयुक्त उपक्रम आणि मनुष्यबळ व्यवस्थापनाचे अधिकार बहाल करण्यात आले. भारतातील सीपीएसई ना महारत्न दर्जा दिल्यानंतर त्यांना अधिक परिचालन आणि आर्थिक स्वायत्तता मिळते. हा दर्जा प्राप्त करण्यासाठी, कंपन्यांना विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात, यामध्ये: नवरत्न दर्जा,शेअर बाजारात सूचीबद्धता, आर्थिक कामगिरी, जागतिक स्तरावर अस्तित्व यांचा समावेश आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ची वित्तीय आघाडीवरची कामगिरी
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, एचएएलने 28,162 कोटी रुपयांची लक्षणीय उलाढाल केली असून 7,595 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, ज्यामुळे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य उपक्रम म्हणून त्याचे स्थान मजबूत झाले. हे आर्थिक यश एचएएलच्या धोरणात्मक उपक्रमांचा आणि अंतराळ उद्योगातील महत्त्वाच्या भूमिकेची साक्ष आहे.
महारत्न दर्जा प्राप्त झाल्यामुळे होणारे परिणाम
महारत्न दर्जा प्राप्त झाल्यामुळे एचएएल च्या आर्थिक स्वायत्ततेमध्ये वृद्धी होईल ज्यामुळे ही कंपनी सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय गुंतवणुकीसंदर्भातील महत्वपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम होईल. अशाप्रकारची स्वायत्तता मिळाल्यामुळे प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक लवकर होण्यासाठी,नवयोजना साकारण्यासाठी आणि एकंदरीत परिचालन कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होईल. याशिवाय हा दर्जा लाभल्याने एचएएल कंपनी भारतातील सर्वात प्रभावशाली आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम म्हणून ओळखली जाईल, ज्यामुळे केवळ देशातच नव्हे तर जागतिक स्तरावरही या कंपनीचे धोरणात्मक महत्व अधोरेखित होईल.
धोरणात्मक महत्व
एचएएल भारताच्या संरक्षण सामर्थ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते,तसेच लष्करी हवाई वाहतुकीत स्वयंपूर्ण होण्यावरही लक्ष केंद्रित करते. या कंपनीने केलेली तेजस या हलके लढाऊ विमानाची आणि हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरची निर्मिती ही भारतीय सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाच्या केंद्रस्थानी आहे. नवोन्मेष आणि गुणवत्ता याविषयीच्या एचएएलच्या वचनबद्धतेने या कंपनीला जागतिक स्तरावरील अंतराळ उद्योगांमध्ये एक महत्वपूर्ण स्थान दिले आहे.
स्वदेशी एरो इंजिन उत्पादनाद्वारे आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल
आत्मनिर्भर भारत होण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालना देण्याकरता, संरक्षण मंत्रालयाने 9 सप्टेंबर 2024 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत Su-30MKI विमानांसाठी 240 AL-31FP एरो इंजिनसाठी 26,000 कोटी रुपयांचा करार केला. एचएएलच्या कोरापुट विभागाद्वारे ही एअरो इंजिन तयार केली जाणार असून अशाप्रकारे हा करार स्वदेशी उत्पादनाची बांधिलकी अधोरेखित करत आहे.
एचएएल चा संक्षिप्त इतिहास
एचएएल चा प्रवास 80 वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी सुरू झाला, जो भारतीय विमान उद्योगासोबत विकसित होत राहीला. 23 डिसेंबर 1940 रोजी, दूरदर्शी व्यक्तीमत्व वालचंद हिराचंद यांनी बंगळुरूमध्ये हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड ची स्थापना केली. या कंपनीचे उद्दिष्ट देशात विमाने तयार करण्याचे होते. भारत सरकार या कंपनीचे 1941 मध्ये भागधारक बनले तर 1942 मध्ये भारत सरकारने या कंपनीचे संपूर्ण व्यवस्थापन नियंत्रण स्वीकारले.
महत्त्वाचे टप्पे
- एकत्रीकरण : 1964 मध्ये, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेडचे एरोनॉटिक्स इंडिया लिमिटेड सोबत एकत्रीकरण झाले आणि कार्यान्वयन सुरळीत चालवण्यासाठी त्याला “हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड” असे नाव देण्यात आले. त्यामुळे विमान आरेखन, विकास, उत्पादन आणि दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करणारी अधिक मजबूत संस्था तयार झाली.
- वैविध्यपूर्ण उत्पादन : गेल्या अनेक दशकात, एचएएल ने आपल्या उत्पादन श्रेणीचा विस्तार हेलिकॉप्टर, इंजिन आणि प्रगत एव्हीओनिक्स प्रणाली पर्यंत केला आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांना पाठिंबा देण्यासाठी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, (ISRO) च्या उपग्रहांसाठी आणि प्रक्षेपण वाहनांसाठी योगदान देणारा एक समर्पित एरोस्पेस विभाग देखील स्थापन केला. 1970 मध्ये, मेसर्स एसएनआयएएस (SNIAS), फ्रान्स यांच्या परवान्याखाली ‘चेतक’ आणि ‘चीता’ हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी बंगळुरूमध्ये एक विभाग स्थापन करण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय सहयोग : एचएएल ने तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त उपक्रमांसाठी विविध आंतरराष्ट्रीय भागीदारी केली आहे. ज्यामुळे सुखोई-30 MKI च्या निर्मितीसह विमान उत्पादनात एचएएल ने आपली क्षमता वाढवली आहे. कंपनीने एअरबस, बोईंग, रोल्स रॉयस, IAI, आणि रोसोबोरोनएक्सपोर्टसह प्रमुख जागतिक विमान कंपन्यांना उच्च-सुस्पष्ट संरचनात्मक आणि संमिश्र कार्य पॅकेजेस, असेंब्ली आणि एव्हियोनिक्स वितरित करून विश्वासार्हता प्राप्त केली आहे.