नाशिक – हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांसाठी आर्थिक सहाय्य योजना व्यवस्थापनाने जाहीर केली आहे. या योजनेची घोषणा झाल्यानंतर कामगार संघटनेच्या मागणीला यश आल्याचे कामगार संघटनांनी सांगितले. या योजनेत अकाली मयत मृत्यु झालेल्या कामगारांच्या वारसास कामगाराच्या सेवानिवृत्ती वयापर्यंत दरमहा आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
कोरोना महामारीच्या या कठीण काळात संपूर्ण देशात अराजकता निर्माण झाली असून देशभरात झालेल्या जीवितहानी मध्ये बऱ्याच एचएएल कामगार बांधवाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकाली मयत होणाऱ्या कामगारांच्या कुटुंबियांची परिस्थिती विचारात घेता त्यांच्या कुटुंबियातील वारसास नोकरी द्यावी किंवा आर्थिक मदत म्हणून दरमहा रक्कम देणारी योजना द्यावी अशी मागणी एचएएल कामगार संघटनेकडून करण्यात आली होती. एचएएल कामगार संघटनांच्या या मागणीला यश आले असून ‘एचएएल कुटुंब’ ही भावना डोळ्यापुढे ठेवत ऐतिहासिक अशी योजना व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
या योजनेत एचएएल परिवारातील १ जानेवारी २०२० नंतर आत्महत्या वगळता कुठल्याही कारणाने मयत होणाऱ्या कामगार, अधिकारी बांधवाच्या वारसास (पती/पत्नी किंवा सहचारी मयत असेल तर २१ वर्षाखालील मुलगा अविवाहित २५ वर्षाखालील मुलगी यांना दरमहा १५ हजारापासून २० हजार त्यांच्या वेतन श्रेणी नुसार आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही मदत मयत कामगाराच्या सेवानिवृत्ती वयापर्यंत देण्यात येणार आहे.
Financial Assistance scheme for the Dependant of Deceased Employees” नावाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेची अमंलबजावणी १-१-२०२० पासून करण्यात येणार असून त्याबाबत परिपत्रक उच्च व्यवस्थापणाने लागू केले आहे. कामगार बांधवांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर त्यांच्या कुटुंबियांसाठी अर्थ सहाय्य देणारी योजना एचएएल कामगार संघटनेच्या पाठपुराव्यातून आल्याने संघटनेने समाधान व्यक्त केले असून परिवारातील कर्त्या व्यक्तीच्या जाण्याने आर्थिक दृष्ट्या निर्माण होणारी अडचण या योजनेने दूर होण्यास हातभार लागणार आहे.
कामगारांच्या अकाली मयत होण्याने त्याच्या कुटुंबियांसाठी साहाय्य म्हणून चांगली ‘मासिक आर्थिक सहाय्य योजना’ असावी अशी मागणी एचएएल कामगार संघटनेकडून उच्च व्यवस्थापनाकडे सातत्याने करण्यात येत होती. आमच्या एचएएल परिवारातील मयत कामगारांच्या कुटुंबियांना या योजनेचा नक्की आधार होईल, सार्वजनिक उपक्रम असलेल्या एचएएलमध्ये व्यवस्थापणाकडून कामगार आणि अधिकारी वर्गाच्या कुटुंबियांची काळजी करत चांगली अशी योजना राबविण्यात आली आहे. यासह केंद्र सरकार,संरक्षण मंत्रालयाची दुसरी चांगली योजना आल्यास ती योजना लागू करण्याचे देखील मान्य करण्यात आल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय एचएएल समन्वय समितीचे प्रवक्ते आणि कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांनी सांगितले.