नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एका महिलेच्या केसांवर कथितरित्या थुंकून केस कापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. व्हिडिओची दखल घेऊन जावेद हबीब यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जावेद हबीब यांच्यावर चौफेर टीका होत आहे. या प्रकरणात आता राष्ट्रीय महिला आयोगाने हस्तक्षेप करून दिल्ली पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. महिला आयोग जावेद हबीब यांना नोटीसही पाठविणार आहे.
बघा जावेद हबीब यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ
https://twitter.com/iRudraShastri/status/1479162188593987588?s=20
हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब हे बडौत येथील ब्यूटिशियन पूजा गुप्ता यांच्या केसांवर थुंकून केस कापतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मुजफ्फरनगरमधील एका कार्यक्रमातील आहे. पीडित महिलेने मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर या घटनेची तक्रार दिली आहे. मुजफ्फरनगरच्या मुंसूरपूर पोलिस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये जावेद हबीब महिलेला सांगतात की, केस खराब आहेत. त्यानंतर महिलेच्या केसांवरून कंगवा फिरवताना बोलतात, जर केसांमध्ये पाणी कमी असेल तर…तेवढ्यात ते महिलेच्या केसांवर थुंकतात आणि म्हणतात, आता पहा केसांत कसा जीव आला आहे.
बघा ही महिला काय म्हणते आहे (व्हिडिओ)
https://twitter.com/swati_gs/status/1479053824685797376?s=20
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हबीब महिलेच्या केसांवर थुंकल्यानंतर उपस्थित नागरिक हसताना गोंगाट करताना दिसत आहेत. काही जण टाळ्याही वाजवतात. खुर्चीवर बसलेली पीडित महिला तेव्हा शांत राहिली. नंतर तिने आपली भडास काढली.
हबीब यांच्याकडून दिलगिरी
या घटनेवर सर्वत्र टीका सुरू झाल्यानंतर जावेद हबीब यांनी गुरुवारी रात्री उशिरा माफी मागितली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करून त्या कार्यक्रमात वापरलेल्या शब्दांवर दिलगिरी व्यक्त केली. परंतु महिलेच्या केसांवर थुंकण्याबद्दल मात्र त्यांनी चकार शब्दही काढला नाही.