पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – प्रत्येकालाच आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि सुंदर असावे असे वाटते. यासाठी प्रत्येक जण काळजी घेतात, त्यातच तरुण-तरुणी आपल्या केसांची तर खूपच निगा राखतात. परंतु केस गळणे ही आजच्या काळात प्रत्येकासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे.
हिवाळा असो की उन्हाळा, केसांमध्ये कोंड्याची समस्या खूप त्रासदायक असते. उन्हाळ्यात घाम येणे आणि कोंडा यामुळे केसांना अत्यंत खाज सुटते. जर कोंडा उपचार न करता तसाच ठेवला तर तापमानात वाढ झाल्याने केसात जीवाणूंची वाढ होऊ शकते. केसांमध्ये कोंडा झाल्यास खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते. कोंडा झाल्यामुळे केस कमकुवत होतात आणि लवकर तुटू लागतात.
कोंड्यावर उपचार करण्यासाठी केसांवर कॉस्मेटिक उत्पादन वापरल्याने केसांवर अनेक दुष्परिणाम होतात. कोंडयाचा त्रास होत असेल तर अद्रक (आले)चा प्रभावी वापर करावा. औषधी गुणधर्मांनी समृद्ध आले केसांच्या मुळापासून कोंडा दूर करते आणि केसांच्या समस्यांवर उपचार करते. या आयुर्वेदिक उपचाराने केवळ कोंडाच नाही तर केसही निरोगी आणि सुंदर दिसतील. विशेष म्हणजे आयुर्वेदानुसार आद्रक किंवा आल्याचा वापर केल्याने केसांच्या कोंड्यावर उपचार होऊ शकतात.
कोंडापासून मुक्त होण्यासाठी, खोबरेल तेल कोमट गरम करा आणि त्यात आल्याच्या रसाचे काही थेंब घाला आणि चांगले मिसळा. हे तेल टाळूला लावून मसाज केल्याने कोंडा दूर होईल.
कोंडा दूर करण्यासाठी आले किसून घ्या आणि तुमच्या आवडीच्या केसांच्या तेलात मिसळा आणि काही दिवस असेच राहू द्या. काही दिवसांनी आल्याचे तेल तयार झाल्यावर ते गाळून टाळूवर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा, कोंडा दूर होईल.
जर केसांमधला कोंडा दूर करायचा असेल तसेच केसांना चमक आणायची असेल, तर एक कप तांदळाच्या पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर आणि आल्याचा रस घालून ते चांगले मिसळा. त्यानंतर आता या पाण्याने केस धुवा, फायदा होईल.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध आलेचा शॅम्पू बनवूनही वापर केला जाऊ शकतो. कारण अद्रक शैम्पू केसांसाठी अतिशय सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. शॅम्पू बनवण्यासाठी थोडा सल्फेट फ्री शाम्पू घ्या आणि त्यात एक चमचा आल्याचा रस घाला. दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि केसांवर लावा. या शॅम्पूचा वापर केल्याने केस स्वच्छ होतील तसेच कोंडा दूर होईल.