इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वाराणसीतील प्रसिद्ध ज्ञानवापी कॅम्पसमधील वाजुस्थळ वगळता इतर कॅम्पसच्या सर्वेक्षणासंदर्भातील याचिकेवर आदेश आला आहे. जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने आदेश दिले आहेत की, माँ शृंगार गौरी मूळ प्रकरणात ज्ञानवापी येथील सील वाजुखाना वगळता बॅरिकेडेड क्षेत्राचे रडार सर्वेक्षण करता येईल. हे आदेश भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला देण्यात आले आहेत. आदेशानुसार सील केलेली जागा वगळता इतर सर्व ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
हिंदू पक्षाच्या चार याचिकाकर्त्या रेखा पाठक, मंजू व्यास, लक्ष्मी देवी आणि सीता साहू यांच्या वतीने १६ मे रोजी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. ज्ञानवापी येथील सील केलेला वाजुखाना वगळता उर्वरित भागाचे पुरातत्व विभागाने (एएसआय) रडार तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण करावे, असे सांगण्यात आले. १९ मे रोजी अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने यावर आक्षेप घेतला. १४ जुलै रोजी सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने आदेशाची फाइल राखून ठेवत सुनावणीसाठी २१ मे ही तारीख निश्चित केली होती. अखेर या प्रकरणी आज सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी १६ ऑगस्ट रोजी होणार आहे.
जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात अर्ज स्वीकारल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच, हा मोठा विजय असल्याचे वर्णन हिंदू पक्षाने केले आहे. या सर्वेक्षणातून ज्ञानवापीचे वास्तव काय आहे हे स्पष्ट होईल, असा युक्तिवाद हिंदू बाजूच्या वकिलांनी केला आहे. सर्वेक्षणात कोणतेही नुकसान न होता दगड, मूर्ती, भिंती व इतर बांधकामांचे वय कळेल. दुसरीकडे, विरोधी अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने सर्वेक्षण करण्याच्या अर्जाला विरोध केला आहे.
ज्ञानवापी कॅम्पसमध्ये असलेल्या वाजुखानामध्ये अस्वच्छता पसरवल्याप्रकरणी आणि शिवलिंगासारख्या आकृतीवर दिलेले वादग्रस्त विधान याप्रकरणी दाखल केलेल्या निरीक्षण अर्जावर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश विनोद कुमार सिंग यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. एहतेशाम अब्दी आणि शवनवाझ परवेझ या वकीलांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी यांच्या वतीने वकिली दाखल केली. इतर विरोधी पक्षांना हजर राहण्यासाठी न्यायालयाने १६ ऑगस्ट ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.