इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुरु-शिष्याचे महत्त्व काही वेगळे सांगायला नको. गुरुप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यापेक्षा कोणतीही चांगली संधी नाही. त्यातच यंदाची गुरुपौर्णिमा खास असणार आहे. ज्योतिषांच्या मते यावेळी गुरुपौर्णिमेला ग्रहांचा विशेष संयोग होत आहे.
गुरुपौर्णिमा कधी असते?
आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. त्यातही यंदाची गुरुपौर्णिमा अतिशय खास आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा याशिवाय आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा आणि वेद व्यास जयंती या नावाने देखील ओळखले जाते. यंदा गुरुपौर्णिमा सोमवार ३ जुलै २०२३ ला होणार आहे.
यंदाचे वैशिष्ट्य काय?
यंदा याच दिवशी तीन शुभ योग जुळून आले आहेत. यादिवशी ब्रह्मयोग, इंद्र योग आणि बुधादित्य राजयोग जुळून आले आहेत. या शुभ योगांमध्ये गुरूंची दीक्षा घेणं अतिशय शुभ मानलं जातं. गुरुपौर्णिमा ही वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वाची आहे. कुंडलीतील बृहस्पति उच्च आणि मजबूत स्थितीत असेल तर तुम्हाला आयुष्यात यश, प्रगती आणि कीर्ती लाभते. त्यामुळे कुंडलीतील गुरु बलवान करण्यासाठी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरूची पूजा करायला हवी असं ज्योतिषशास्त्रज्ज्ञ सांगतात.
या राशीच्या लोकांना होणार लाभ
मिथुन – मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात यश मिळेल. कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळेल.
सिंह – सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती येईल. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ.
धनु – धनु राशीच्या लोकांसाठी यशाचे नवीन मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. गुंतवणुकीसाठीही चांगला काळ आहे.
महर्षी व्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता, म्हणून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि महर्षी व्यास जयंती असेही म्हणतात. महर्षी व्यास हे महर्षी पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र आहेत. महर्षी व्यासांनी चार वेदांचे ज्ञान दिले होते. धर्मग्रंथानुसार व्यासांना तिन्ही कालखंडांचे जाणकार मानले जाते आणि त्यांनी महाभारत ग्रंथ, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, अठरा पुराणे, श्रीमद् भागवत आणि अगणित सृष्टींचे भांडार मानवजातीला दिले आहे. गुरुपौर्णिमेची सुरुवात महर्षी व्यासांच्या पाच शिष्यांनी केली होती.