पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला. गुरुपौर्णिमेला वेदव्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी वेद व्यास यांनी मानवजातीला चारही वेदांचे ज्ञान प्रथमच दिले होते, म्हणून महर्षि वेद व्यास यांना पहिले गुरु मानले जाते. हिंदू धर्मात गुरूला देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते, कारण केवळ गुरूच देवाबद्दल सांगतात आणि भगवंताच्या भक्तीचा मार्ग दाखवतात. अशा स्थितीत दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. जाणून घेऊया या वर्षीचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि गुरूंची पूजा पद्धती…
यंदाची तारीख
पंचांगानुसार, या वर्षी आषाढ महिन्याची पौर्णिमा २ जुलै रोजी रात्री ८.२१ वाजता सुरू होत आहे. ही पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ जुलै रोजी संध्याकाळी ५.०८ वाजता संपेल. तिथीनुसार, यावर्षी गुरु पौर्णिमा ३ जुलै, सोमवारी साजरी केली जाईल.
अशी करा पुजा
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पुजा करावी.
या दिवशी सकाळी आंघोळीनंतर प्रथम स्वच्छ कपडे घालावेत.
त्यानंतर आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणी स्थापित केलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींना नमन करा आणि त्यांची विधिवत पूजा करा.
यानंतर, पूजेच्या ठिकाणी आपल्या गुरूंचे चित्र ठेवा, हार आणि फुले अर्पण करा आणि त्यांना तिलक लावा.
पूजेनंतर आपल्या गुरूंच्या घरी जाऊन त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या.
पूजा साहित्य
गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुजेमध्ये सुपारीची पाने, पिवळे कापड, पिवळी मिठाई, नारळ, फुले, वेलची, कापूर, लवंगा आदी पदार्थांचा समावेश करावा. या गोष्टींशिवाय गुरुपौर्णिमेची पूजा अपूर्ण मानली जाते.
गुरुपौर्णिमेचे महत्त्व
शिष्याला योग्य मार्ग दाखविण्याचे काम गुरू करतात. म्हणूनच हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुंच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. अशा वेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा.