मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या सदावर्ते यांनीच आंदोलकांना चिथावणी दिली आणि आंदोलकांनी थेट पवार यांच्या घरावर चालून गेले, असा आरोप आहे. त्यामुळेच सदावर्ते सध्या तुरुंगात आहेत. सदावर्ते यांनी संपकरी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचाही आरोप आहे. त्यातच त्यांच्या घरात नोटा मोजण्याचे मशिन सापडल्याने सारेच अवाक झाले आहेत. अखेर आता सदावर्ते यांनी न्यायालयात मोठी कबुली दिली आहे.
सदावर्ते यांनी न्यायालयात कबुली दिल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांकडून ते २०० ते ३०० रुपयांची फी आकारत असल्याची बाब पुढे आली आहे. राज्यभरात हजारो कर्मचारी संपावर होते. त्यामुळे सदावर्ते यांनी लाखो रुपये उकळल्याचे बोलले जात आहे. मात्र, हे पैसे न्यायालयीन फीसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या मर्जीनुसार घेतल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे. तसेच, या पैशांचे सदावर्ते यांनी पुढे काय केले, असा प्रश्न सरकारी वकीलांनी उपस्थित केला आहे. आता या प्रकरणीही पुढे चौकशीला सदावर्ते यांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.