मुंबई – अनेक पाणीपुरवठा योजना या क्षेत्रीय स्तरावर करण्यासारख्या आहेत. त्या तातडीने पूर्ण कराव्यात तसेच रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नाशिक आणि कोकण विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सुधारणात्मक पुनर्जोडणीचे उद्दिष्ट हवे
यावर्षी सुधारणात्मक पुनर्जोडणी आणि नवीन योजना मोठ्या प्रमाणात पूर्ण करावयाच्या आहेत. त्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल गतीने तयार करावेत, प्रत्येक तालुक्यात दररोज, दर महिन्याला किती नळजोडण्या करणार, पुनर्जोडणी करणार याचे उद्दिष्ट ठरवून त्याप्रमाणे नियोजन करावे, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्र्यांनी दिले.
जल यात्रा, उत्सवाप्रमाणे काम करा
पाणीपुरवठा योजना पूर्ण करताना तसेच नळ जोड जोडण्यांचे उद्दिष्ट गाठत असताना हे एक आंदोलन आहे, ही एक जलयात्रा आहे असे समजून काम करा. ज्याप्रमाणे आपण उत्सवात काम करतो तसे जोमाने काम केले तरच आपण दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू शकाल, असा कानमंत्र श्री.पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.
बाह्य स्रोतांद्वारे मनुष्यबळ घ्यावे
काही जिल्ह्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. अशा जिल्ह्यांनी बाह्य स्रोतांद्वारे /कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, असे निर्देशही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी चंद्रकांत गजभिये, यांच्यासह नाशिक व कोकण विभागातील पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आणि सर्व कार्यकारी अभियंता बैठकीला उपस्थित होते.