इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गुजरातच्या समुद्रात १८०० कोटी रुपयांचा ड्रग्जसाठा असणारी बोट कोस्ट गार्ड व गुजरात एटीएसने पकडली आहे. सुमारे ३०० किलो एमडी ड्रग्जचा साठा या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर समुद्रात करण्यात आली आहे.
या कारवाईबाबत मिळालेली माहिती अशी की, रात्रीच्या अंधारात समुद्रातून पाकिस्तानच्या दिेशने ही बोट येत होती. कोस्ट गार्डच्या स्पीड बोटस आणि मोठ्या जहाजांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करुन ही बोट थांबवली. त्यानंतर तीची तपासणी केल्यानंतर मोठा साठा सापडला. बोडीत सापडलेले ड्रग्ज हे मेथॅम्पेटामिन असल्याचे सांगण्यात आले. या ड्रग्जची आंतराष्ट्रीय बाजारात किंमत १८०० कोटी आहे.
मासेमारीच्या नावाखील ही बोट तस्करी करत असल्याचे समोर आले आहे. ही बोट पश्चिम बंगालमधील काकव्दीप मासेमारी बंदारात नोंदणीकृत होती. तपासणी दरम्यान ती वैध नोंदणी कागदपत्रांशिवाय असल्याचे आढळून आले. या जहाजावरील १४ भारतीय क्रू सदस्यांपैकी एकाही सदस्यांकडे मासेमारीसाठी अनिवार्य असणारी अधिकृत कागदपत्र नव्हती.