इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमधील वडोदरा येथे दिवाळीच्या रात्री वातावरण अचानक बिघडले. फटाक्यांच्या आतषबाजीवरून दोन समाजाचे लोक समोरासमोर आले. फटाके सुरू असताना अचानक पेट्रोल बॉम्बचा पाऊस सुरू झाला. दगडफेक सुरू झाली आणि जाळपोळ झाल्याने परिसरात खळबळ उडाली. रात्री उशिरा जातीय चकमकीच्या वेळी आलेल्या पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले. पोलिसांना लक्ष्य करत पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. कसेबसे परिस्थिती नियंत्रणात आली. दोन्ही बाजूंच्या एकूण १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या वडोदरा येथील पाणीगेट भागात मंगळवारी रात्री उशिरा १ वाजेच्या सुमारास जातीय हिंसाचार झाला. यापूर्वीही याच परिसरात जातीय तणाव निर्माण झाला होता. रॉकेटने दुचाकीला धडक दिल्याने हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. हिंसाचार करण्यापूर्वी, अंधारात त्यांची ओळख होऊ नये म्हणून बदमाशांनी परिसरातील पथदिवे बंद केले होते. परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यात पोलिसांवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश आहे. आरोपींनी घराच्या तिसऱ्या मजल्यावरून पोलिसांना लक्ष्य करत पेट्रोल बॉम्ब फेकला. मात्र, पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले. वडोदरा डीसीपी यशपाला जगनिया यांनी सांगितले की, चकमकीत कोणीही जखमी झाले नाही. मोटारसायकलवर रॉकेट क्रॅकर पडल्याने आग लागल्याचे त्यांनी सांगितले.
फटाके फोडण्यावरून झालेल्या वादानंतर लोकांनी एकमेकांवर बॉम्ब फेकण्यास सुरुवात केली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दोन समाजाच्या लोकांनी एकमेकांवर दगडफेकही केली. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेत सहभागी असलेल्या दोन्ही समुदायातील लोकांची ओळख पटवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वडोदराचे पोलिस आयुक्त समशेर सिंग यांनी सांगितले की, दोन समुदायांमधील गैरसमजामुळे हाणामारी झाली. त्याचवेळी पाणीगेट पोलिस स्टेशनचे निरीक्षक के के कमवाना म्हणाले, “एक रॉकेट बाईकवर पडला, ज्यामुळे तिला आग लागली. त्यानंतर दगडफेक झाली. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. आतापर्यंत सुमारे २० जणांना अटक करण्यात आली आहे.” यापूर्वी ३ ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे तिरंगा फडकावण्यावरून झालेल्या संघर्षानंतर पोलिसांनी ४० जणांना अटक केली होती.
Stone pelting on Diwali night, petrol bomb thrown on Police Officer in Vadodara https://t.co/zEIJFuOqVv pic.twitter.com/7IjNh2lGBs
— DeshGujarat (@DeshGujarat) October 25, 2022
Gujrat Vadodara Communal Riot Tense Situation