इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने तिस्ता सेटलवाड यांना अटक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एटीएसने ही कारवाई केली आहे. 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झाकिया जाफरी यांनी याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळली. आणि तीस्ता सेटलवाड यांच्या एनजीओची पुढील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सेटलवाड यांच्याविरुद्ध एटीएसची कारवाई महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर आली आहे. यानंतर शनिवारी सकाळीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका टीव्ही मुलाखतीत सेटलवाड यांनी त्यांच्या एनजीओच्या मदतीने गुजरात दंगलीबाबत निराधार माहिती दिल्याचा आरोप केला होता. तिस्ता सेटलवाड कोण आहेत, ज्यांच्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली आहे, हे आपण जाणून घेऊया…
एटीएसने तिस्ता सेटलवाडला ताब्यात घेतल्याचे प्रकरण 2002 मध्ये गुजरातच्या गुलबर्ग सोसायटीच्या घटनेशी संबंधित आहे. ज्यामध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागल्याने काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६८ जणांचा मृत्यू झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या SITने दंगलीच्या १० वर्षांनी म्हणजेच 2012 मध्ये अहवाल सादर केला. त्यात गुलबर्ग सोसायटी प्रकरणात “कोणताही खटला चालवता येण्याजोगा पुरावा” नसल्याचा हवाला देण्यात आला. परिणामी, तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसह अनेक राजकारणी आणि अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरोधात एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
तिस्ता सेटलवाड या सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस (CJP) नावाच्या एनजीओच्या सचिव आहेत, 2002 च्या गुजरात दंगलीतील पीडितांच्या वकिलीसाठी स्थापन केलेली ही संघटना आहे. CJP हे 2002 च्या गुजरात दंगलीतील कथित सहभागाबद्दल नरेंद्र मोदी आणि इतर अनेक राजकारणी आणि सरकारी अधिकार्यांवर फौजदारी खटला चालवण्याची मागणी करणारे सहकारी याचिकाकर्ते आहेत.
24 जून 2022 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना एसआयटीने दिलेली क्लीन चिट कायम ठेवली. तसेच, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी याचिकाकर्त्या झाकिया जाफरी यांच्या भावनांचा “चुकीच्या हेतूने” गैरवापर केला असे स्पष्ट सांगितले. त्याअनुषंगानेच सेटलवाड यांच्याविरुद्ध अधिक चौकशी होण्याची गरज आहे, असे सांगितले.
तिस्ता आणि तिचे पती जावेद आनंद यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी 2007 पासून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्याची मोहिम चालवली. दंगलग्रस्तांच्या नावावर तब्बल 6 ते 7 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम गोळा करून फसवणूक केली. देणग्यांद्वारे जमा झालेला हा निधी दाम्पत्याने दारू आणि इतर भपकेबाज वस्तूंवर खर्च केल्याचा आरोप न्यायालयात करण्यात आला. तिस्ता यांच्यावर आणखी एक आरोप आहे की, त्यांनी परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केले आणि 2009 मध्ये यूएसस्थित फोर्ड फाऊंडेशनने त्यांच्या एनजीओला दिलेल्या निधीचा गैरवापर केला. विशेष म्हणजे, गुजरात एटीएसने मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तीस्ता सेटलवाड यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ज्यामध्ये त्यांच्यावर आयपीसीच्या कलम ४६८ आणि ४७१ अंतर्गत खोटारडेपणाचा आरोप करण्यात आला आहे.
gujrat riot 2022 who is teesta setalwad and what is the connection