विशेष प्रतिनिधी, अहमदाबाद
कोरोनाची दुसरी लाट सुरू असली तरी नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. गुजरातमध्ये असेच एक बेजबाबदारपणाचे उदाहरण समोर आले आहे. कोरोना निर्बंध लावलेले असतानाही एका कोचिंग क्लासमध्ये विनामास्क आणि शारिरीक अंतराचे नियम न पाळता ५५० हून अधिक विद्यार्थ्यांना शिकविले जात होते. या क्लासवर पोलिसांनी गुजरात पोलिसांनी छापा मारून क्लासच्या मालकाला अटक केली आहे.
राजकोट जिल्ह्यातील जसदान शहरात एका कोचिंग क्लासमध्ये ५५० हून अधिक विद्यार्थ्यांना कोरोना नियमांचे उल्लंघन करून शिकविले जात होते, असे पोलिसांनी सांगितले. राजकोटपासून २१५ किलोमीटर दूर असलेल्या क्लासवर छापेमारी करून मालक जयसुख सांखलवा (वय ३९) याला अटक केल्याचे पोलिस अधीक्षक बलराम मीणा यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे. आरोपी संखलवा जवाहर नवोदय विद्यालय आणि बालाचडी सैनिक शाळेच्या प्रवेश परीक्षेसाठी कोचिंग सेंटर वसतिगृह चालवत होता.
गुप्त माहितीच्या आधारे या परिसरात छापा मारल्यावर ९-१० वर्षांच्या ५५५ विद्यार्थ्यांना शिकविले जात असल्याचे आढळले. या मुलांनी मास्क घातला नव्हता, तसेच शारिरीक अंतर राखण्याचे नियम पाळले नसल्याचे आढळले, असे पोलिसांनी सांगितले. १५ मेपासून विद्यार्थी पालकांच्या सहमतीने येथील वसतिगृहात राहात होते, असे आरोपी संखलवा याने अटकेपूर्वी पत्रकरांना सांगितले. यातील बहुतांश विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी बसलेले आहेत. मात्र ती परीक्षा स्थगित झाली आहे. पालकांनी मुलांना वसतिगृहातच राहण्याची परवानगी दिल्याचा दावा आरोपी संखलवा याने केला आहे.