इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यात असलेल्या प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या शिखरावर तब्बल ५०० वर्षांनंतर ध्वजारोहण झाले आहे. मंदिराच्या परिसराती दर्ग्याचे स्थलांतर करण्यात आले आहे. सुमारे ५०० वर्षांपूर्वी सुलतान महमूद बेगडा याने मंदिराचे शिखर नष्ट केले होते. आणि तेथे दर्गा उभारली होती. आता दर्ग्याची देखरेख करणाऱ्यांच्या संमतीने स्थलांतरित झाले आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज येथे किर्ती ध्वज फडकविण्यात आला आहे.
मंदिराचे विश्वस्त अशोक पंड्या यांनी सांगितले की, सुमारे ५०० वर्षांपूर्वी सुलतान महमूद बेगडा याने मंदिराचे शिखर नष्ट केले होते. पावागड टेकडीवर अकराव्या शतकात बांधलेल्या या मंदिराच्या शिखराची पुनर्विकास योजनेअंतर्गत पुनर्स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी पुनर्विकसित महाकाली मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंड्या म्हणाले की, पंतप्रधान नव्याने बांधलेल्या शिखरावर पारंपारिक लाल ध्वजही फडकवतील. हे मंदिर चंपानेर – पावागड पुरातत्व उद्यानाचा एक भाग आहे, जे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे आणि दरवर्षी लाखो भाविक भेट देतात.
May Kalika Mata's blessings be upon all of us. Addressing a programme at Pavagadh Hill. https://t.co/poLpvqwmy2
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2022
याने तोडला होता मंदिराचा माथा
पांड्या यांनी सांगितले की, असे मानले जाते की ऋषी विश्वामित्र यांनी पावागडमध्ये कालिका देवीची मूर्ती पवित्र केली होती. पंधराव्या शतकात चंपानेरवरील हल्ल्यात सुलतान महमूद बेगडा याने मंदिराचा मूळ शिखर पाडला होता. पीर सदनशाहचा दर्गा शिखर पाडल्यानंतर मंदिराच्या वर बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंड्या म्हणाले, ‘पताका फडकवण्यासाठी खांब किंवा शिखर लागते. मंदिराला शिखर नसल्यामुळे या वर्षांत पताका फडकावला गेला नाही. काही वर्षांपूर्वी जेव्हा पुनर्विकासाचे काम सुरू झाले, तेव्हा आम्ही दर्ग्याची देखरेख करणाऱ्यांना आम्ही विनंती केली की दर्गा हलवण्यात यावी. जेणेकरून मंदिराच्या शिखराची पुनर्बांधणी करता येईल.’
१२५ कोटींच्या निधीतून मंदिर पुनर्विकास
पंड्या म्हणाले की अशी एक लोककथा आहे ज्यानुसार सदनशहा हिंदू होता आणि त्यांचे मूळ नाव सहदेव जोशी असून त्यांनी बेगडा यांना खूश करण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला होता, अशी लोककथा आहे. असे मानले जाते की मंदिर पूर्णपणे नष्ट होण्यापासून वाचवण्यात सदनशहाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दर्गा सौहार्दपूर्णपणे मंदिराच्या जवळ नेण्यासाठी एक करार झाला होता. विशेष म्हणजे १२५ कोटी रुपये खर्चून मंदिराचा पुनर्विकास करण्यात आला, ज्यामध्ये टेकडीवर असलेल्या मंदिराच्या पायऱ्यांचे रुंदीकरण आणि आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण यांचा समावेश होता, असेही पंड्यांनी स्पष्ट केले आहे.