इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या संवेदनशील प्रकरणामुळे देशात हिंसाचार किंवा दंगल होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत त्यातच गुजरातमधील जुनागढ येथे दर्गा हटवण्यावरून हिंसाचाराची घटना घडली आहे. या घटनेत १ जणाचा मृत्यू, तर ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १७४ जणांना अटक केली आहे. जमावाने पोलीस चौकीची तोडफोड करत वाहनांना आग लावली आहे. गुजरात सरकारने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत वरिष्ठ पातळीवर चौकशीचे आदेश दिले आहेत.
अचानक ३०० जणांचा जमाव
जुनागड महापालिकेच्या वतीने अनाविकृत बांधकाम आणि प्रार्थना स्थळे हटवण्याची मोहीम सध्या सुरू आहे.जुनागढमधील माजेवाडी गेटसमोर असलेला दर्गा अनधिकृत असल्याची नोटीस महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बजावली होती. जागेच्या मालकीबाबत कागदपत्रे सादर करा, अन्यथा दर्गा हटवण्यात येईल, असे या नोटीसीत म्हटले होते. यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली होती. तसेच ही नोटीस दर्ग्याच्या बाहेर लावण्यासाठी महापालिका अधिकारी शुक्रवारी पोहचले, तेव्हा अचानक सुमारे ३०० जणांचा जमाव एकत्र आला. त्यांनी घोषणाबाजी करत दगडफेक करण्यास सुरूवात केली.या घटनेत पोलीस उपअधिक्षकासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर, एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे.
सुमारे ६०० लोक जमले
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सदर अनाधिकृत दर्गा हटविण्यात येणार होता. परंतु त्याचवेळी जमावाने गोंधळ घातला आणि अचानक दगडफेक सुरू झाली याप्रकरणी पोलीस अधीक्षक रवी तेजा वासमसेट्टी यांनी सांगितलं की, माजेवाडी गेटजवळील दर्ग्याला महापालिकेने ५ दिवसांत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. शुक्रवारी सांयकाळी अचानक तिथे सुमारे ६०० लोक जमा झाले होते. तेव्हा पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री १० वाजेच्या सुमारास जमावाने पोलीस आणि नागरिकांवर दगडफेक केली. तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रू धुरांचा वापर केला. १७४ जणांना ताब्यात घेतले आहे, असेही वासमसेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.