इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती पत्नीचे नाते हे विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असते, असे म्हटले जाते. परंतु काही वेळा वादविवाद आणि भांडणे प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. मात्र एका पत्नी आपल्या पतीला वारंवार तुरुंगात जाण्याची वेळ आणली ! एक अजबच घटना म्हणावी लागेल, कारण या पत्नीने १० वर्षात तब्बल ७ वेळा आपल्या पतीला तुरुंगात पाठवले आहे. गुजरात मधील अहमदाबाद नजिक मेहसाना भागात ही घटना घडली आहे.
प्रेमविवाहानंतर…
संसाराचा गाडा हाकताना पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात, तर काही वेळा ते विकोपालाही जातात. मात्र या पत्नीने १० वर्षात तब्बल ७ वेळा आपल्या पतीला तुरुंगात धाडले आहे. विशेष बाब म्हणजे पती तुरुंगात गेल्यानंतर प्रत्येकवेळी पत्नीनेच जामीनदार होऊन त्याची सुटका केली आहे. प्रेमचंद माळी असे पतीचे नाव असून सोनू माळी असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. सन २००१ मध्ये सोनू व प्रेमचंद यांचा विवाह झाला होता. १३ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाले. सन २०१५ साली पत्नी सोनू हिने पती प्रेमचंद याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत पहिला गुन्हा दाखल केला. तसेच तिने घटस्फोटासाठी अर्ज देखील केला. यावर सुनावणी देताना न्यायालयाने प्रेमचंद याने पत्नीला दरमहा २ हजार रुपये इतकी पोटगी द्यावी, असे आदेश दिले. रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रेमचंदला पत्नीला पोटगी देणे अशक्य झाले. त्यामुळे न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
५ महिने तुरुंगात
पत्नीच्या तक्रारीमुळे प्रेमचंदला १० वर्षात ७ वेळा सुमारे पाच महिने तुरुंगात जावे लागले. मात्र आश्चर्य म्हणजे पत्नी सोनूने हमी घेत जामीवर त्याची सुटका केली. त्यानंतर कायदेशीररित्या विभक्त होऊनही प्रेमचंद आणि सोनू पुन्हा एकत्र राहू लागले. मात्र काही दिवसांनी पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि प्रेमचंदने सोनूला मारहाण करण्यास सुरुवात केली. सोनूच्या तक्रारीवरून सन २०१६ ते २०१८ या काळात प्रेमचंदला ४ वेळा अटक करण्यात आली. प्रत्येकवेळी काही दिवसांनी सोनूनेच त्याला जामीन मिळवून दिला. २०१९ आणि २०२० मध्येही प्रेमचंद पत्नीला पोटगी देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला आणखी दोनदा तुरुंगात जावे लागले. यावेळीही पत्नी सोनू हिनेच त्याला जामीन मिळवून दिला.
आता पतीचीच तक्रार
पुन्हा दोघांमध्ये गोडवा निर्माण झाल्याने दोघे एकत्र राहू लागले. मात्र, २०२३ मध्ये पुन्हा प्रेमचंदने पत्नीला पोटगी दिली नाही. त्यामुळे त्याला पुन्हा तुरुंगात जावे लागले. नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा सोनूने त्याच्या जामीनाची व्यवस्था केली. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर प्रेमचंद हा पुन्हा पत्नीसोबत राहू लागला होता. आता पुन्हा दोघांमध्ये वाद झाला असून यावेळी प्रेमचंद याने पत्नीनेच आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. याबाबत त्याने पोलिसांत तक्रार दिली असून त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत. मात्र हे प्रकरण पाहून पोलीसही चक्रावले आहेत.