इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशप्रमाणेच गुजरातमध्ये सांप्रदायिक हिंसाचारात कथित सहभाग असलेल्या आरोपींची दुकाने उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने खंभात तालुक्यातील शकरपूर गावात सात दुकाने बुल्डोझर चालवत जमीनदोस्त केले. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारात कथितरित्या सहभाग असलेल्या आरोपींची ही दुकाने होती. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता.
आणंद जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी स्थानिक पोलिसांच्या देखरेखीखाली झोपडीवजा दुकाने आणि गाड्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. ही दुकाने बेकायदेशीररित्या उभारण्यात आली होती, असा आरोप आहे. दंगल, कट रचणे आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गावातील ६१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती शकरपूरचे सरपंच दिनेश पटेल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
सरपंच पटेल म्हणाले, की झोपडीवजा दुकानात काही वर्षांपर्यंत सिगारेट आणि पान मसाला विक्री केला जात होता. सर्व दुकाने दंगलीतील आरोपींची असून त्यापैकी एक रज्जाक पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपींनी पंचायत कार्यालयाजवळच्या सरकारी जमिनीवरही अतिक्रमण केले होते.
आणंद येथील जिल्हाधिकारी एम वाय दक्सिनी म्हणाले, की एसडीएम (खंभात)चे प्रशासकीय पथक आणि पोलिस अधीक्षक (खंभात) यांच्या बंदोबस्तात पथकाने सरकारी जमिनीवरील दुकाने आणि गाड्यांचे अतिक्रमण शुक्रवारी हटविले आहे.
रामनवमीला मिरवणुकीदरम्यान शकरपूर गावात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. त्यादरम्यान खंभातच्या छतरी बाजार येथील रहिवासी कन्हय्यालाल राणा (५७) यांचा मृत्यू झाला होता. मंदिरातून दर्शन घेऊन राणा घरी परतत होते. ते मिरवणुकीत सहभागी झाले नव्हते, अशी माहिती राणा यांच्या कुटुंबीयांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.