इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात जोरदार प्रचार आणि निवडणुकीचा ज्वर आहे, तर राजकोट जिल्ह्यातील एका गावात मात्र खुपच शांतता आहे. राज समाधीयाळा असे या गावाचे नाव आहे. हे गाव निवडणुकीच्या नाटकापासून आणि प्रचारापासून कोसो दूर आहे. याचे कारणही ग्रामस्थांनी सांगितले आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना गावात प्रवेश व प्रचार करण्यास गावातील लोकांनी बंदी घातली आहे. मात्र, गावातील लोक नक्कीच मतदान करतील. जे मतदान करणार नाहीत त्यांना दंडही होणार आहे. राज समाधीयाळा गावातील लोकांना असे वाटते की उमेदवारांना प्रचार करण्यास परवानगी देणे गावासाठी हानिकारक आहे. त्यामुळे गावात कोणत्याही पक्षाला प्रवेश आणि प्रचार करू दिलेला नाही. गावात प्रचाराला पूर्णपणे बंदी आहे.
मतदान न केल्यास एवढा दंड
राज समधियाळा हे गाव राजकोटपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. मतदानात जास्तीत जास्त सहभागी व्हावे यासाठी येथील ग्रामस्थांनी केवळ राजकीय प्रचारावरच बंदी घातली नाही, तर मतदान न करणाऱ्यांना ५१ रुपयांचा दंडही ठोठावला जाणार आहे. ग्रामविकास समितीने गावातील लोकांसाठी अनेक नियम केले आहेत. गावातील लोक त्याच्याशी जोडलेले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जातो. सक्तीचे मतदान करण्याचाही नियम आहे. गावात प्रत्येक निवडणुकीत जवळपास १०० टक्के मतदान होते.
सरपंचाची निवड
या गावचा सरपंचही सर्वसंमतीने निवडला जातो. दंडाच्या निर्णयामुळे येथे जवळपास १०० टक्के मतदान झाल्याचे विद्यमान सरपंच सांगतात. १७०० लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावाने एक समिती स्थापन केली आहे. मतदानाच्या काही दिवस आधी समितीचे सदस्य गावकऱ्यांची बैठक घेतात आणि कोणाला मतदान करता येत नसेल तर समितीला त्याचे कारण स्पष्ट करावे लागते.
इतक्या वर्षांपासून
राजकीय पक्षांना गावात प्रचार करू न देण्याचा नियम १९८३ पासून लागू असल्याचे सरपंचांनी सांगितले आहे. येथे कोणत्याही पक्षाला प्रचार करण्यास परवानगी नाही. राज समाधीयाळा गावात प्रचार केला तर त्यांची मते कमी होतील, हा विश्वास राजकीय पक्षांनाही आहे.
गावात आधुनिक सुविधा
राज समाधीयाळा गावात वाय-फाय, सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट यासारख्या जवळपास सर्वच अत्याधुनिक सुविधा आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचे जीवन सुखकर झाले आहे. गावात सुमारे ९९५ मतदार आहेत. ते त्यांच्या इच्छेनुसार मतदान करतातच.
Gujrat Election Village Ban on Campaigning Political Parties