इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अक्षरशः पानिपत झाले आहे. तब्बल सातव्यांदा विधानसभेवर आपला झेंडा फडकावताना भारतीय जनता पक्षाने आजवरचे सर्वच विक्रम मोडित काढले आहेत. अतिशय दणदणीत विजय मिळवून भाजपने काँग्रेसला चारीमुंड्या चित केले आहे. १८२ जागा असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपने तब्बल १५६ जागांवर यश मिळविले आहे. या अफाट लाटेत काँग्रेस भुईसपाट झाली आहे. हे असे का झाले, काँग्रेसचा पराभव का झाला, हे जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच, काँग्रेसने अवघ्या १७ जागा जिंकल्या असून आता विरोधी पक्ष नेतेपदही पक्षाला मिळणार नसल्याचे दिसून येते.
एकेकाळी संपूर्ण देशावर केंद्रात इतकेच नव्हे तर अनेक राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते, मात्र खूप वर्ष सत्ता उपभोगून झाल्यानंतर काँग्रेसच्या सत्तेला ओहटी लागली, त्यामुळे केंद्रातून सत्ता तर गेलीच पण अनेक राज्यात देखील काँग्रेसने सत्ता गमावली असून तेथे आता भाजपचे वर्चस्व दिसून येते. तर सध्या काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाने आपली सत्ता निर्माण केली आहे. तर काही ठिकाणी या प्रादेशिक पक्षांनी आपले वर्चस्व गेल्या अनेक वर्षांपासून कायम ठेवले आहे.
गेल्या काही निवडणुकांचा कल
१९८४ मध्ये ५१६ लोकसभा जागांपैकी काँग्रेसने तब्बल ४० जागांवर विजय मिळवला होता तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या तेलगु देसम पार्टीला ३० जागा मिळाल्या होत्या. केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले होते. इतकेच नव्हे तर विरोधी पक्षाचे फारसे नामोनिशान देखील राहिले नव्हते, तेव्हा अत्यंत दुबळा असा विरोधी पक्ष होता. विशेष म्हणजे केंद्रामध्ये भाजपचे केवळ २ खासदार निवडून आले होते. आता कालौघात परिस्थिती बदलली असून संपूर्ण पारडे फिरले आहे. आता असे म्हटले जाते की, दिवसेंदिवस काँग्रेसचे घसरगुंडी सुरूच असून भाजप हा बलाढ्य पक्ष होत आहे, किंबहुना काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भाजपमय करण्यासाठी भाजप नेते सरसावले आहेत असे म्हटले जाते. सध्याच्या गुजरात विजयाचे शिल्पकार अर्थाचाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांचेही नाव घेतले जाते.
पाटीदार आणि पटेल
प्रत्येक राज्याचे राजकारण हे वेगवेगळे असते गुजरातच्या राजकारणामध्ये देखील असे वेगळेपण दिसून येते, ते म्हणजे येथे पाटीदार आणि पटेल समाजाचे प्रचंड वर्चस्व असून हा समाज ज्या पक्षाकडे जाईल, त्या पक्षाची सत्ता गुजरात राज्यात असते, असे दिसून येते सध्या देखील असेच घडले आहे गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने १५६ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला १७ जागांवर तसेच आम आदमी पार्टीला ५ आणि अपक्षांना चार जागांवर विजय मिळाला. भाजपने गुजरातमध्ये सातव्यांदा सत्ता स्थापन केली आहे. गुजरातमध्ये भाजपनं आतापर्यंतच्या सर्वाधिका जागा मिळवल्या आहेत.
मोदींचा करिष्मा
गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला यामागचे सर्वांत मोठे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वादळी प्रचार होय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सत्ता कायम आणण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. या निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधानांनी अहमदाबाद-सुरतमध्ये ३१ रॅली आणि २ मोठे रोड शो केले होते. या रॅली आणि रोड शोला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. यावरुनच गुजरातमध्ये भाजप विजयी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते.
विरोधी पक्षनेतेपदाचे गणित
गुजरात विधानसभेमध्ये एकूण १८२ जागा आहेत. भाजपने तब्बल १५६ जागांवर विजय मिळविला आहे. तर, काँग्रेस केवळ १७ जागांवर जाऊन पोहचली आहे. गुजरात विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते पदासाठी कमीत कमी १० टक्के जागा निवडून येणे आवश्यक आहे. म्हणजेच १८२ जागांच्या तुलनेत किमान १८ जागा मिळणे आवश्यक आहे. आता काँग्रेसला १८ही जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना हे पद मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत २७.३ टक्के मते मिळाली आहेत.
आपमुळे काँग्रेसला फटका
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने प्रवेश करत निवडणूक लढवली. आपली सत्ता स्थापन व्हावी, या आशेने आम आदमी पक्षाने प्रचारावेळी चांगली कंबर कसली होती. आपने गुजरातमध्ये जोरदार प्रचार देखील केला. अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये रॅली काढली, रोडशो घेतले. तरी देखील आप पक्षाला फक्त ५ जागांवर गुजरातमध्ये समाधान मानावे लागले. आम आदमी पक्षाने काँग्रेसला फटका बसला आहे. कारण, काँग्रेसची मतेच आपकडे वळल्याचे सांगितले जात आहे.
राहुल गांधींची यात्रा
खरे म्हणजे काँग्रेसने संपूर्ण ताकद लावली असती तर त्यांच्या जागा कदाचित वाढल्या असत्या, विशेषतः राहुल गांधी हे संपूर्ण भारतभर अनेक राज्यांमध्ये भारत जोडो यात्रा काढत असताना त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी थोडा अधिक वेळ द्यायला हवा होता, परंतु त्यांनी एक प्रकारे गुजरातकडे दुर्लक्षच केले, असे म्हटले जाते. काहीही असो विजयाला खूप कारणे असतात, पराभवायची कारणे सांगितली जात नाहीत, किंबहुना ती कोणालाही पटत नाहीत असे म्हटले जाते.
Gujrat Election Congress Performance Opposition Leader
Politics