इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरवेळी येथे काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चढाओढ दिसून येत असली तरी यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आप पक्षानेही या निवडणूकीत जोरदारपणे सहभाग घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २७ वर्षे सत्तेवर असलेला भाजपा आपली सत्ता टिकवण्यासाठी तर काँग्रेस सत्तापरिवर्तनासाठी संघर्ष करत आहे. तर अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये चमत्कार करण्याची आस बाळगून आहे. दरम्यान, गुजरातमधील मतदानाला काही दिवस उरले असताना काही वृत्तवाहिन्यांनी फायनल ओपिनियन पोल जाहीर केले आहेत.
एबीपी न्यूज-सी वोटरने जाहीर केलेल्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ओपिनियन पोलनुसार १८२ जागा असलेल्या गुजरातमध्ये भाजपाला ४६ टक्के, काँग्रेसला २७ टक्के, आपला २१ टक्के आणि इतरांना ६ टक्के मते मिळू शकतात. तसेच निवडणुकीच्या जागांचा विचार केल्यास भाजपाला १८२ पैकी १३४ ते १४२ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला २८ ते ३६ आणि आपला ७ ते १५ जागा मिळू शकतात तर इतरांच्या खात्यामध्ये ० ते २ जागा जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. इंडिया टीव्ही मॉटराईजनेदेखील याबाबत ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या पोलनुसार गुजरातमध्ये एकूण १८२ जागांपैकी भाजपाला ११७ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ५९ आणि आपला ४ तर इतरांना २ जागा मिळू शकतात, असे दिसून आले आहे.
Gujrat Election Campaign Political Parties Opinion Poll
Politics Congress BJP AAP Assembly