इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी विजय मिळवला आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवणाऱ्या भाजपने एकाचवेळी अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. भाजपने विधानसभेच्या सर्वाधिक जागा जिंकल्याच, पण सर्वाधिक मतांची टक्केवारी मिळवून सर्व विक्रम मोडीत काढले आहे. ही निवडणूक जिंकून सलग सातव्यांदा सत्तेवर आलेल्या भाजपने यापूर्वी कधीही न पाहिलेले चित्र आपल्यासमोर मांडले. सर्वाधिक जागा जिंकून भाजप गुजरातमध्ये आणखी मजबूत झाला आहे. भाजपच्या या विजयाची प्रमुख कारणे पाहिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी फॅक्टरपासून ते पाटीदारांच्या मतांपर्यंत खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. गुजरातमध्ये भाजपच्या विजयाची ही प्रमुख कारणे आहेत.
१. पंतप्रधान मोदी
गुजरात हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घर आहे, जिथे त्यांनी तीनदा मुख्यमंत्रीपद भूषवले होते. मोदींनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा काम केले आणि नंतर ते केंद्रात गेले. यावरून समजते की इथले लोक त्यांना किती आवडतात. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींनी अनेक निवडणूक रॅली आणि जाहीर सभा घेतल्या.
गुजरातमध्ये भाजपचे सरकार आले नाही तर त्याचा थेट परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिसून येईल, याची जाणीव पंतप्रधान मोदींसह संपूर्ण भाजप पक्षाला आहे. गुजरातचा बालेकिल्ला जिंकणे भाजपसाठी खूप महत्त्वाचे होते. गुजरातमध्ये मोदींची जादू यावेळीही कायम राहिली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आदिवासी बांधवांचे मत
गुजरात विधानसभा निवडणुकीत २५आदिवासी जागांवर भाजपची जादू चालली. यावेळी भाजपला आदिवासींच्या सर्वाधिक जागा मिळाल्या. ज्या भागात भाजपचा पराभव होत राहिला, तिथे आता भाजपने १५० चा आकडा पार केला आहे. आदिवासी भागात भाजपला जवळपास ४७ टक्के मते मिळाली आहेत. वास्तविक यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी सर्वाधिक लक्ष आदिवासी भागांवर ठेवले होते.
यावर्षी एप्रिलमध्ये मोदी गुजरातच्या आदिवासीबहुल दाहोद जिल्ह्यात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आदिवासी जॅकेट आणि टोपी घातली होती. या कार्यक्रमात मोदींनी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा आणि इतर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचेही स्मरण केले होते.
काँग्रेस कमकुवत होणे
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालामागे काँग्रेस कमकुवत होणे हेही एक प्रमुख कारण आहे. यावेळी काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे आदिवासी नेते मोहनसिन राठवा आणि हिमांशू व्यास यांनीही विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपच्या छावणीत प्रवेश केला होता. त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष कमकुवत होत गेला. गुजरातमध्ये प्रचार करण्याऐवजी काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेत व्यस्त होते. त्यांनी आपला बहुतांश वेळ गुजरातमध्ये न जाता भारत जोडो यात्रेत घालवला. त्यामुळेच गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा पक्षाची कामगिरी खराब राहिली आहे.
आम आदमी पक्षाचा प्रवेश
गुजरात विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पक्षाचा प्रवेश भाजपसाठी अतिशय फायदेशीर ठरला. यावेळी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये आप पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला, मात्र निकालानुसार काँग्रेसची मते आपच्या बाजूने जाताना दिसत आहेत. याचा सर्वाधिक परिणाम काँग्रेसच्या संख्येवर झाला. २०१७ च्या गुजरात निवडणुकीत काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी ‘आप’ला २० पेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागले. जिथे काँग्रेसची मते आपकडे वळाली. पण, भाजपची मते कुठेच गेली नाहीत.
पाटीदार सजामाचा पाठिंबा
२०१७ मध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखालील पाटीदार आंदोलनामुळे भाजपला मोठा फटका बसला होता. हे लक्षात येताच भाजपने हार्दिक पटेलला आपल्या बाजूने घेतले. यामुळे भाजपला पाटीदार अनामत आंदोलन समिती (PAAS) च्या तरुणांचा पाठिंबा मिळू शकला. गुजरातमधील तरुणांचे भविष्य भाजप सरकारच्या हातात सुरक्षित असेल, असे हार्दिक पटेलने सांगितले होते. म्हणजेच, पाटीदार समाजाचा मोठा पाठिंबा मिळाल्याने भाजपचा गुजरातमध्ये मोठा विजय झाला आहे.
Gujrat Election BJP Victory Major Reasons
Politics