अहमदाबाद – गुजरातमधील तौक्ते वादळग्रस्तांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपये तातडीची मदत जाहीर केली आहे. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार आंतरमंत्रालयीन पथक पाठवणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
वादळात मरण पावलेल्यांच्या वारसाला प्रत्येकी १ लाख तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानही प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही मोदी यांनी येथील आढावा बैठकीत दिली. सौराष्ट्रातल्या उना, जाफराबाद,महुवा या भागाची हवाई पाहणी मोदी यांनी आज केली.
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही कोकण किनारपट्टीलगत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी या भागाचा पाहणी दौरा केला नाही किंवा केंद्र सरकारने मदतही जाहिर केली नाही. त्यामुळे याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून जोरदार टीका केली जात आहे. गुजरातमध्ये भाजप सरकार असल्याने मोदींनी गुजरात दौरा करुन मदत जाहिर केली. त्याचवेळी महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे या प्रश्नी राजकारण जोरदार तापण्याची चिन्हे आहेत.