अहमदाबाद (गुजरात) – महत्त्वाच्या पदांवर असलेले राजकीय नेते अथवा वरिष्ठ पदांवर असलेल्या व्यक्तींना जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक जण वैयक्तिक वाद किंवा पैशांच्या मागणीसाठी असे कृत्य करतात. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना असाच अनुभव आला आहे. पोलिसांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना एका ज्येष्ठ नागरिकाने व्हिडिओ प्रसारित करून धमकी दिली आहे. ज्येष्ठ नागरिकाने मुख्यमंत्र्यांकडे एक कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे. ही रक्कम दिली नाही तर परिणामांना सामोरे जा असा इशारा दिला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुजरात पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले असून, ज्येष्ठ नागरिकाला पकडण्यासाठी पथके तयार केली आहेत.
पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बनासकांठा जिल्ह्यातील पोलिसांनी योग्य पावले उचलून यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. धमकी देणाऱ्या ज्येष्ठाला लवकरच पकडण्यात येईल.
बनासकांठा जिल्हा पोलीस अधीक्षक पूजा यादव म्हणाल्या, बटुक मुरारी ऊर्फ महेश भगत यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. कदाचित त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्यांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला असेल.
पूजा यादव म्हणाल्या, स्थानिक पोलिसांनी भगत यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार केली आहेत. ते वाव तालुक्यातील रहिवासी असून, सध्या बनासकांठा जिल्ह्यातील थरद शहरात वास्तव्याला आहे. यापूर्वी ते भजन गात होते. परंतु सध्या कोणतेही काम करत नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचा फोन बंद आहे. ज्येष्ठ नागरिकाचा शोध लागल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. भगत अविवाहित असून त्यांची मानसिक स्थिती अस्थिर आहे, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. खूप वर्षांपूर्वीच त्यांनी घर सोडले होते.