नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. पंजाबमध्ये जसा प्रयोग केला तसाच प्रयोग आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये केला आहे. गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून इसुदान गढवी आणि गोपाल इटालिया हे दोन चेहरे पुढे आले होते. इसुदान गढवी हे वरचढ ठरले आहेत. परिणामी अरविंद केजरीवाल यांनी इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. जाणून घेऊया कोण आहेत इसुदान गढवी…
इसुदान गढवी यांचा जन्म १० जानेवारी १९८२ रोजी जामनगर जिल्ह्यातील पिपलिया गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील खेराजभाई शेती करतात. राजकारणात येण्यापूर्वी इसुदान गढवी पत्रकार होते. इसुदान गढवी यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण जाम खंभलिया येथे पूर्ण केले. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली. नंतर गुजरात विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले.
इसुदान यांनी गुजरातमधील अनेक माध्यम संस्थांमध्ये काम केले आहे. पोरबंदरमधील एका स्थानिक वाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे ते दूरदर्शनमध्येही रुजू झाले. २०१५ मध्ये, इसुदान एका आघाडीच्या गुजराती वाहिनीचे संपादक झाले. या वाहिनीवर त्यांचा ‘महामंथन’ नावाचा शो खूप गाजला. यामध्ये शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
महामंथन शोमधूनच इसुदान गढवी यांना राज्यस्तरीय मान्यता मिळाल्याचे सांगितले जाते. या शोमध्ये ते सामान्य लोक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न देसी आणि निर्दोष पद्धतीने मांडायचे. हा शो गुजरातमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. एक पत्रकार म्हणून इसुदान गढवी यांनी अहमदाबाद, पोरबंदर, वापी, जामनगर आणि गांधीनगर अशा अनेक शहरांमध्ये वार्तांकन केले.
इसुदान गढवी यांनी गेल्या वर्षी पत्रकारिता सोडून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर राजकारणातही सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. शुक्रवारी आपल्या भाषणात ते म्हणाले की, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला विजयी करा, जर मी तुमची स्वप्ने पूर्ण केली नाहीत तर मी राजकारण सोडेन. गढवी ज्या समाजातून येतात त्यांची राज्यातील लोकसंख्या ४८ टक्के आहे.
https://twitter.com/ArvindKejriwal/status/1588478724647063552?s=20&t=_iJE3v2SsysTJzGxulUUnQ
Gujrat CM AAp Candidate Isudan Gadhvi