नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -गुजरातमध्ये पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या(NIDM) कार्यकारी संचालकांच्या नेतृत्वाखाली आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाची(IMCT) स्थापना केली आहे. हे पथक लवकरच या राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देईल.
25 ते 30 ऑगस्ट दरम्यान गुजरात राज्याला राजस्थान आणि गुजरात या राज्यांच्या वर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मोठी झळ पोहोचली होती.
यावर्षी हिमाचल प्रदेश या राज्यालाही ठराविक अंतराने झालेला मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलन या आपत्तींची झळ पोहोचली. केंद्रीय गृहमंत्रालय या राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सातत्याने संपर्कात आहे आणि तिथे जास्त हानी झाल्याची माहिती मिळाल्यास तिथे देखील आयएमसीटी तैनात करण्यात येतील. यंदाच्या मान्सून हंगामात इतर काही राज्यांना देखील मुसळधार पाऊस, पूर, ढगफुटी, भूस्खलन इ. आपत्तींची झळ पोहोचली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार या आपत्तीग्रस्त राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑगस्ट 2019 मध्ये घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने आयएमसीटी स्थापन केल्या असून त्यांनी आसाम, केरळ, मिझोराम आणि त्रिपुरा या पूर/भूस्खलनग्रस्त राज्यांना हानीचे जागेवरच मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या निवेदनाची वाट न पाहता भेट दिली आहे. नागालँड या राज्यासाठी देखील आयएमसीटी स्थापन करण्यात आले असून लवकरच ते या आपत्तीग्रस्त राज्याला भेट देईल. यापूर्वी आयएमसीटी आपत्तीग्रस्त राज्य सरकारचे निवेदन प्राप्त झाल्यानंतरच त्या राज्यांना भेट देत असायचे.