नाशिक – पोलीस आयुक्तालया मार्फत नववर्ष स्वागत समिती सदस्यांना माननीय पोलीस आयुक्तांनी भेटीसाठी बोलवले होते, त्यात नववर्ष स्वागत समिती आणि पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत, मधल्या काळात झालेले सर्व समज – गैरसमज दूर झाले. आणि आज दिनांक ३१ मार्च रोजी सायंकाळी पोलीस आयुक्तांमार्फत स्वागत समितीला सर्व कार्यक्रमांसाठी परवानगी देण्यात आली. परंतु समिती मार्फत आधीच सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे स्वागत यात्रा वगळता इतर कार्यक्रमांसाठी हातात वेळ देखील शिल्लक नसल्याने, नववर्ष स्वागत समिती तर्फे माननीय पोलीस आयुक्तांकडे सदर रद्द झालेल्या कार्यक्रमांसाठी पुन्हा एकदा नवीन तारखांसह हे सर्व कार्यक्रम करण्याची परवानगी मागितलील असता पोलिसांमार्फत यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
म्हणून नववर्ष स्वागत समिती तर्फे हा कार्यक्रम पुन्हा एकदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिनांक २ तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी शहरातील प्रमुख चौकात व प्रमुख मंदिरांमध्ये गुढी उभारून त्याचे पूजन होणार आहे. शुक्रवार १५ एप्रिल २०२२ रोजी अंतर्नाद , शनिवार १६ एप्रिल २०२२ रोजी महावादन आणि रविवार १७ एप्रिल २०२२ रोजी महारांगोळी या तीन नवीन तारखांना सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत, पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण), गोदाघाट, पंचवटी , नाशिक याठिकाणी कार्यक्रम करण्याची अधिकृत घोषणा या ठिकाणी नववर्ष स्वागत समिती, नाशिक मार्फत करण्यात येत आहे. हे सर्व घडवून आणण्यासाठी महावादनातील सर्व सहभागी वादक, अंतर्नाद मधील सर्व गुरु व सर्व शिष्य आणि त्यांचे पालक, महारांगोळी च्या सर्व सहभागी महिला, स्वयंसेवक, वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व माध्यम प्रतिनिधी आणि सर्व नाशिककर व माननीय पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय अशा सर्वांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले आहे. त्यासाठी समिती मार्फत नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, सचिव जयंत गायधनी यांनी आभार मानले आहे.
 
			








