गुढीपाडवा विशेष लेख – या शतकातील जगातले सर्वांत मोठे मंदिर
श्री लक्ष्मी-नृसिंह स्वामी मंदिर
तिरुपति बालाजी पेक्षाही मोठे मंदिर तेलंगणात व्हावे अशी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि तेलंगणातील जनतेची इच्छा होती. यदाद्री येथील श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिराच्या रुपाने हे स्वप्न गुढीपाडव्याच्या पाच दिवस आधीच साकार झाले आहे. त्यामुळे या वर्षीचा गुढीपाडवा तेलंगणातील जनतेच्या विशेष स्मरणात राहिल!! या शतकातील हे जगातले सर्वात मोठे मंदिर आहे. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण त्याविषयी जाणून घेऊया…
काळा ग्रॅनाइट दगड चुनखडीच्या मिश्रणाने जोडून बांधण्यात आलेले तेलंगणातील यदाद्री भुवनगिरी येथील श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिर सोमवार दिनांक २८ मार्च २०२२ रोजी भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील बालाजी मंदिरापेक्षाही हे मंदिर मोठे आहे. मंदिराचे कळस , स्तंभ आणि दरवाजे यांच्यासाठी १४० किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
गेल्या शतकांत बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये हे सर्वांत मोठे मंदिर आहे. भाविकांना हे मंदिर खुले करण्यापूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर धार्मिक अनुष्ठान,यज्ञ आदि करण्यात आले. तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यात जातीने हजर होते. त्यांचे अध्यात्मिक गुरु चिन्ना जीयर स्वामी यांच्याच अधिपत्या खाली सर्व धार्मिक अनुष्ठानं संपन्न करण्यात आली.
शंभर एक्राची यज्ञ वाटिका
मंदिराचे लोकार्पण करण्यापूर्वी येथे महासुदर्शन यज्ञाचे आयोजन करण्यात आले. यासाठी शभर एकर जागेवर १०४८ यज्ञकुंड तयार करण्यात आले होते.हजारो पंडित आपल्या सहाय्यक गुरुंसह या यज्ञात सहभागी झाले होते.
यदाद्रीचे हे श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिर हैदराबाद पासून ८० किमी अंतरावर आहे. यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यांत समुद्रसपाटी पासून ५१० फूट उंची वरील यदाद्री गुट्टा डोंगरावर एक हजार वर्षे जुने मंदिर आहे. डोंगरावरील गुहेत ज्वाला नृसिंह, गंध भिरंदा नृसिंह, योगानंद नृसिंह यांच्या मूर्ती आहेत. ही गुहा १२ फूट उंच आणि ३० फूट लांबआहे.
सुमारे १५ एकर जागेवर मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले असून २०१६ पासून हे काम सुरु आहे. या मंदिरा भोवती २५०० एकर जागेवर भव्य टाऊनशिप देखील उभारण्याची योजना आहे.
आंध्रप्रदेशाच्या विभाजनानंतर तिरुपती हे शहर आंध्र प्रदेशात गेले. त्यामुळे तेलंगणातही बालाजी मंदिराच्या तोडीचे मंदिर उभारण्याच्या जिद्दीने तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी २०१५ मध्ये यदाद्री येथे श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. त्यासाठी वर्षानुवर्षे टिकणाऱ्या कृष्ण शिला अर्थांत काळ्या ग्रॅनाइट दगडाचा वापर करण्यात आला. या मंदिराच्या पुनर्बांधणी कार्यांत सिमेंटचा थोडाही उपयोग केलेला नाही. २.५ लाख टन ग्रॅनाइट या मंदिराच्या पुरार्बंधनीसाठी वापरण्यात आले आहे. आंध्रप्रदेश मधील प्रकाशम् येथून हे ग्रॅनाइट आणण्यात आले आहे.
मंदिराच्या बांधकामाचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी सिमेंट आणि वाळूचा वापर न करता गूळ, कोरफड,चुना, नारळाच्या काथ्याचे मिश्रण तयार करून त्यात ग्रॅनाइट दगडाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे हे बांधकाम किमान एक हजार वर्षे टिकेल असा अंदाज आहे.
मंदिराचे प्रवेशव्दार पितळे पासून बनविण्यात आले असून त्याला सोंन्याने सुशोभित करण्यात आले आहे.
मंदिराच्या गोपुरम म्हणजे विशेष व्दारावर १२५ किलोग्राम सोने जड़विण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यासह अन्य मंत्र्यानी सोने दान केले आहे. यात सव्वाशे किलो सोने मुख्यमंत्र्यांच्या परिवारातील लोकांनी दान केले आहे. मंदिराचे डिझाईन प्रसिद्ध फ़िल्मी सेट डिझाईनर आनंद साईं यांनी तयार केले आहे.
गेल्या १०० वर्षांत बांधलेले हे जगातील सर्वांत मोठे मंदिर आहे. मंदिराचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे शास्त्रानुसार बांधले आहे.
मोठे राजमहल देखील यदाद्री येथील श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिरा समोर फिके पडतील असे त्याचे सौंदर्य आहे. गर्भगृहाचा घुमट, दरवाजा, ध्वजस्तंभ यासाठी सुमार १४० किलो सोने वापरण्यात आले आहे.
अयोध्येत उभारल्या जाणार्या राम मंदिराचा अंदाजे खर्च ११०० कोटी असेल असे सांगतात. तेलंगणा सरकारने यदाद्री मंदिरासाठी १२०० कोटी रूपये खर्च केले आहेत.